अकोला. दि. – १० अकोला मनपा मध्ये भाजप बहुमताने सत्ताधारी आहे.परंतु त्यांच्या ठायी अनुसूचित जाती विरोधातील आकसा असल्याने नागरी दलित वस्ती सुधार योजनेच्या १५ कोटी रुपये निधी उपलब्ध असताना आजवर केवळ २ कोटी ६२ लाख खर्ची घातले गेले आहेत.त्यामुळे शहरातील दलित वस्त्यातील रस्ते, नाल्या व पिण्याचे पाणी ह्या मूलभूत विकास कामा पासून ह्या वस्त्या वंचित राहिल्या असून ह्या विरोधात अनुसूचित जाती आयोग व सरकार कडे तक्रार करण्यात आल्याची माहिती वंचित बहुजन आघाडी चे प्रदेश प्रवक्ता राजेंद्र पातोडे ह्यांनी दिली आहे.
अकोला महापालिकेतील भाजपा ही अनुसूचीत जाती विरोधात असून गेल्या तीन वर्षातील त्यांच्या सत्ता काळातील अनेक उदाहरणे ह्या वेळी प्रामुख्याने समोर आली आहेत.नागरी दलीत वस्ती सुधार योजनेचा निधी हा प्रामुख्याने त्याच वस्ती करीता वापरला पाहिजे असा नियम आहे.मात्र अकोला मनपाने शहरात नव्याने उभारलेल्या जलकुंभावर त्यातील निधी वळता करून खर्ची घातला होता.गेल्या तीन वर्षात तर दलित वस्त्यांचा हक्काचा निधीच खर्च करायचा नाही.असा चंगच भाजपावाल्यानी मनपा प्रशासनाला हाताशी धरून बांधलेला दिसतो.त्यामुळे कोट्यवधीचा निधी प्राप्त झाला तरी तो खर्च होऊ द्यायचा नाही, हे धोरण राबविण्यात येत आहे.अकोल्याच्या चारी बाजूला मोठ्या प्रमाणात दलित वस्त्या आहेत.त्यामध्ये मूलभूत सुविधांची वानवा असताना त्याची पूर्तता केली जात नाही.
मनपा हद्दवाढीत नव्याने २१ गावाची भर पडली आहे.त्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणात दलित वस्त्या आहेत.परंतु त्यांच्या विकासाकडे लक्ष दिले जात नाही.जो काही निधी खर्च केला जात आहे.तो देखील दलित वस्ती नसलेल्या भागात केला जातो.गौरक्षण रोड वरील कपिलवस्तू नगर हा भाग प्रभाग २० मध्ये समाविष्ट आहे.त्या ठिकाणी दलित वस्ती सुधार निधीतून सार्वजनिक नाला बांधकाम सुरु करण्यात आले आहे.त्याच बरोबर येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा प्रकरण न्यायप्रविष्ट असलेल्या सार्वजनिक भूखंडावर न्यायालयाचा ‘जैसे थे’ ठेवण्याचा आदेश असताना देखील विकास कामे सुरु करण्यात आले आहे.त्यासाठी दलित वस्ती चा निधी वापरला जात आहे.हा निधी प्रभाग १५ मधील नगरसेवकाच्या शिफारशीवर खर्च केला जात आहे.विशेष म्हणजे लॉकडाऊन मध्ये मनपा क्षेत्रातील बांधकामे बंदी असताना हे काम सुरु केले गेले आहे.सदर भाग प्रभाग २० मध्ये असताना तो प्रभाग १५ मधल्या नगरसेवकाचे नावाने खर्च केला जात आहे.
अश्या पद्धतीने चुकीच्या प्रभागात भलत्याच नगरसेवकांची कामे करून दलित वस्ती सुधार योजनेचा निधी संगनमताने लाटला जात आहे.सोबतच अनेक वस्त्यांमध्ये गरज असताना त्या ठिकाणी विकास कामे जाणीवपूर्वक केली जात नाही.भाजप मध्ये ८ नगरसेवक अनुसूचित जातीचे असूनही त्यांनी पक्षापुढे शरणागत पत्करली आहे.त्यामुळे मनपा कडे चालू वर्षी १५ कोटी निधी उपलब्ध असताना त्या पैकी केवळ २ कोटी ६२ लाख खर्ची घातले गेले आहेत.दलित वस्ती सुधार योजना निधी उपलब्ध असताना खर्च न करणे, चुकीच्या ठिकाणी निधी खर्च करणे, कामे न करता बनले काढणे ह्या सर्व गैरप्रकाराची तक्रार अनुसूचित जाती आयोगाकडे करण्यात आली असून राज्य शासना कडे देखील तक्रार केली आहे.ह्या वर कार्यवाई न झाल्यास न्यायालयात जाण्याचा इशारा वंचित बहुजन आघाडीचे वतीने राजेंद्र पातोडे ह्यांनी दिला आहे.