अमरावती: अचलपूर येथील नागपूरला दाखल यापूर्वीच पॉझिटिव्ह आलेल्या महिलेच्या मुलाचा रिपोर्टही पॉझिटिव्ह आल्याने आज त्याच्या संपर्कातील 15 जणांचे विलगीकरण करण्यात आले.
अचलपूर येथील 60 वर्षीय महिलेला सतत ताप आल्याने नागपूर येथील खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर कोरोनाची लक्षणे आढळल्याने त्यांना नागपूर जिल्हा कोविड रूग्णालयात हलविण्यात आले व स्वॅब घेण्यात आला. तो पॉझिटिव्ह आला. त्यांच्यावर नागपुरात उपचार होत आहेत. त्यांच्या संपर्कातील 23 नागरिकांचे विलगीकरण करण्यात आले होते. त्यापैकी सदर महिलेच्या मुलाचा (36 वर्षे) स्वॅबही नागपूर येथे घेण्यात आला. त्यांचा रिपोर्टही पॉझिटिव्ह आला आहे. त्यांनाही नागपूर रूग्णालयात दाखल करून घेण्यात आले आहे.
सदर युवकाच्या संपर्कातील 15 जणांचे विलगीकरण करण्यात आले असून, त्यांना कुटीर रूग्णालय व इतर विलगीकरण कक्षात हलविण्यात आले आहे. याबाबत संपर्क शोध व इतर प्रक्रिया होत आहे, अशी माहिती अचलपूर नगरपालिकेच्या मुख्याधिकारी डॉ. अश्विनी वाघमळे यांनी दिली.