अकोला,दि.९- शहरी भागात आरोग्य तपासणी मोहिम राबविल्यानंतर व पॉझिटीव्ह रुग्णांच्या निकट संपर्कातील अति जोखमीच्या व दूरस्थ संपर्कातील कमी जोखमीच्या व्यक्तींची विगतवारी करा. अति जोखमीच्या व्यक्तींना अलगीकरणात ठेवण्यात येत असतांनाच जे कमी जोखमीचे व्यक्ती आहेत त्यांचेवरही आरोग्य यंत्रणांनी विशेष लक्ष ठेवावे, असे निर्देश राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, कामगार राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी आज येथे दिले.
आज जिल्हा नियोजन भवनात विविध आढावा बैठका घेतल्या. त्यात कोवीड १९ संदर्भातील उपाययोजनांचाही आढावा घेण्यात आला. यावेळी विधान परिषद सदस्य आ. अमोल मिटकरी, विधानसभा सदस्य आ. नितीन देशमुख, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, पोलीस अधिक्षक अमोघ गावकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार, आरोग्य उपसंचालक डॉ. फारुकी, अपर जिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, उपविभागीय अधिकारी डॉ. निलेश अपार तसेच अन्य अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी माहिती देण्यात आली की, मनपाने शहरात राबविलेल्या आरोग्य तपासणी मोहिमेत अद्याप ६८ हजार जणांची तपासणी केली आहे. तसेच आधीच्या पॉझिटीव्ह रुग्णांच्या तपासणीनंतर निकट संपर्कातील व्यक्ती सोडल्यास ७९६ लोक हे कमी जोखमीचे व दूरस्थ संपर्कातील आहेत. अशा लोकांच्यातही अन्य आजार असलेल्या व ज्येष्ठ नागरिक असलेल्या लोकांचे वेगळी विगतवारी करुन त्यांचेवर विशेष लक्ष आरोग्य यंत्रणांनी द्यावे, असे निर्देश ना. कडू यांनी दिले. तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची सुरक्षा यंत्रणा मजबूत करा. डॉक्टर व रुग्णांव्यतिरिक्त अन्य कोणताही व्यक्ती आत जाता कामा नये. तसेच जेवण चांगले नसल्याच्या तक्रारी अद्याप येत आहेत, हा दर्जा सुधारण्यात यावा असेही निर्देश ना. कडू यांनी दिले. तसेच जिल्ह्यातील मृत्यू दर हा चिंताजनक असून तो कमी करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न डॉक्टरांनी करावे, असेही त्यांनी सांगितले.
क्षेत्रस्तरावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी या संदर्भात काही आणखी उपाययोजना असल्यास त्या सुचवाव्या, त्यातील योग्य व चांगल्या उपाययोजनांचा अवश्य विचार केला जाईल, असेही ना. कडू यांनी आश्वस्त केले. तसेच येत्या पावसाळ्यात हवामान बदलामुळे होणारे विविध आजार लक्षात घेता आरोग्य यंत्रणांनी अधिक दक्ष रहावे, असेही ना. कडू यांनी निर्देश दिले.
यावेळी आ. मिटकरी यांनी सुचना केली की, एकीकडे शहरी भागात आरोग्य यंत्रणेला मनुष्यबळाची आवश्यकता असतांना ग्रामिण भागात डॉक्टर गैरहजर असल्याचे दिसून येते. अशा गैरहजर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी, अशी सुचना त्यांनी केली.