अकोला,दि.९- जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी अकोला आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, २००५, भारतीय साथ रोग नियंत्रण अधिनियम, १८९७ व सार्वजनिक आरोग्य विभाग अधिसुचना अन्वये प्राप्त अधिकारानुसार कोव्हिड रूग्णांना भरती करून त्यांचेवर योग्य ते उपचार करण्याकरिता भारत सरकार यांचे पोर्टलवर नोंदणीकृत असलेले आयकॉन हॉस्पिटल, अकोला व ओझोन हॉस्पिटल अकोला ही दोन्ही खाजगी रूग्णालये नियमानुसार शुल्क आकारून त्यांच्या आस्थापनेवरील कार्यरत आवश्यक वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांचेसह कोवीड हॉस्पिटल (Dedicated Covid Hospital) म्हणून अधिग्रहीत करण्यात येत असल्याचे आदेश निर्गमित केले आहेत.
त्यासंदर्भातील अटी व शर्तीही आदेशात नमूद केल्या आहेत. त्यानुसार अधिग्रहीत करण्यात आलेल्या आयकॉन हॉस्पिटलचे संचालक यांनी कोव्हिड- १९ च्या रूग्णांकरीता स्वतंत्र प्रवेशाची व्यवस्था करावी तसेच चार ICU Bed व सहा Bed Isolation Unit उपलब्ध करून द्यावे. त्याचप्रमाणे अधिग्रहीत करण्यात आलेल्या Ozone Hospital चे संचालक यांनी कोव्हिड- १९ च्या रूग्णांकरीता स्वतंत्र प्रवेशाची व्यवस्था करावी तसेच तीन ICU Bed व आठ Bed Isolation Unit उपलब्ध करून द्यावे. ICMR यांनी दिलेल्या मार्गदर्शक सुचनांचे काटेकोरपणे पालन करणे बंधनकारक राहील.
महाराष्ट्र शासनाचे वेळोवळी निर्गमित होणारे आदेश तसेच मार्गदर्शन सुचनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करणे बंधनकारक राहील. उपचारार्थ लागणारा पुरेशा प्रमाणातील तज्ञ डॉक्टर व कर्मचारी/अधिकारी वर्ग २४x ७ नियमितपणे उपस्थित ठेवावा लागेल. याप्रमाणे अधिगृहीत करण्यात आलेल्या दोन्ही रूग्णालयाने आदेशात नमुद केल्याप्रमाणे जिल्हा शल्यचिकित्सक अकोला यांचेकडे सुपूर्द करण्याची कार्यवाही करावी. यारूग्णालयांमध्ये अधिष्ठाता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा शल्य चिकित्सक यांनी आवश्यकतेप्रमाणे रूग्ण पाठविण्याची व्यवस्था करावी. जिल्हा शल्य चिकित्सक अकोला यांनी उपरोक्त् दोन्ही रूग्णालयामध्ये ज्या व्यक्ती निरिक्षणाखाली ठेवण्यात येतील त्या वैद्यकीय कक्षात तसेच या संदर्भात काम करणारे शासकीय अधिकारी व्यतीरिक्त कोणालाही प्रवेश राहणार नाही. या ठिकाणी आलेल्या व गेलेल्या व्यक्तीच्या आवश्यक नोंदी ठेवण्यात याव्या.
तसेच सदर क्षेत्र हे फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ नुसार प्रतिबंधात्मक क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. रूग्णालयाचे व्यवस्थापक यांनी अधिग्रहीत करण्यात आलेल्या रूग्णालयामध्ये विद्युत, पाणी व इतर आवश्यक सुविधा अखंडीत उपलब्ध करून द्याव्या. तसेच रूग्णालयामध्ये एक नोडल अधिकारी नेमावा. या रूग्णालयामध्ये ज्या व्यक्ती निरिक्षणाखाली ठेवण्यात येतील त्यांची माहिती गोपनीय राहील या बाबत संबंधीत वैद्यकीय अधिकारी यांनी दक्षता घ्यावी,असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.