अमरावती, दि. 9 : ‘महावितरण’च्या दर्यापूर तालुक्यातील गायवाडी येथील 33 केव्ही उपकेंद्राच्या रोहित्राची क्षमता 10 एमव्हीएपर्यंत वाढविण्यात आली असून, राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या हस्ते त्याचे उद्घाटन आज झाले. दर्यापूर शहर व परिसरात अखंडित वीजपुरवठ्यासाठी या क्षमतावाढीचा फायदा होईल, असे प्रतिपादन पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी यावेळी केले.
दर्यापूरचे आमदार बळवंतराव वानखडे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. जिल्हा परिषदेचे आरोग्य सभापती बाळासाहेब हिंगणीकर, सुधाकरराव भारसाकळे, अभिजित देवके, बबनराव देशमुख, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती बाबाराव पाटील बरबट, उपविभागीय अधिकारी प्रियांका आंबेकर, तहसीलदार योगेश देशमुख यांच्यासह महावितरणचे विविध अधिकारी- कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
पालकमंत्री श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, एकात्मिक ऊर्जा विकास योजनेतून (आयपीडीएस) गायवाडी उपकेंद्राच्या रोहित्राची पाच एमव्हीएने (मेगा व्होल्ट ॲम्पिअर) क्षमतावाढ केल्यामुळे दर्यापूर शहर व लगतच्या परिसरातील नागरिकांना अखंडित वीजपुरवठ्यासाठी क्षमतावाढीचा लाभ होईल. त्यासाठी महावितरणच्या अधिकारी व कर्मचारी यांनीही वीजपुरवठ्यात इतर अडचणी येऊ नयेत यासाठी दक्षता घेतली पाहिजे. पावसाळ्याच्या काळात वीजेचे खांब कोसळणे, तारा तुटणे यामुळे अनेकदा वीजपुरवठा खंडित होतो. अशा घटना घडल्या तर तत्काळ दुरुस्तीची कार्यवाही केली पाहिजे. नागरिकांची गैरसोय होता कामा नये.
ग्रामीण भागात, तसेच शेतीला वीजपुरवठा अखंडित ठेवण्यात यावा. शहरी विभागाच्या वीज विकासासाठीच्या एकात्मिक ऊर्जा विकास योजनेप्रमाणे ग्रामीण वीज विकासासाठी दीनदयाळ उपाध्याय ग्रामज्योती योजनेतही (डीडीयुजीजेवाय) ठिकठिकाणी कामे राबवावीत, असे निर्देश पालकमंत्र्यांनी यावेळी दिले. जिल्ह्यात सर्वदूर अखंडित वीजपुरवठ्यासाठी आवश्यक त्या सर्व कामांसाठी निधी उपलब्ध करून देण्यात येईल. त्याअनुषंगाने आवश्यक प्रस्ताव द्यावेत व त्यापूर्वीची मंजूर असलेली अपूर्ण कामे तत्काळ पूर्ण करावीत, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
उपकेंद्रांवरील सुविधांची पाहणीही पालकमंत्र्यांनी यावेळी केली. वीजपुरवठ्याच्या अनुषंगाने नवीन प्रस्ताव, अडचणी आदी बाबींचा आढावाही त्यांनी घेतला.पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी आज दर्यापूर दौ-यात बनोसा येथील संत गाडगेमहाराज बालगृहाला भेट देऊन तेथील सुविधांची पाहणी केली. विविध मान्यवर यावेळी उपस्थित होते.