गाडेगाव (गोकुळ हिंगणकर)- वान प्रकल्प कालव्यावरील नवीन कडुलिंबाच्या झाडांच्या अवैध वृक्ष तोडीकडे तेल्हारा वान प्रकल्प उपअभियंता अनिकेत गुल्हाने दुर्लक्ष करीत असल्याची तक्रार गाडेगाव ग्रामपंचायत प्रशासनाने अकोला वन विभागाचे उपवनसंरक्षक यांच्याकडे पर्यावरण दिनी केली आहे. गाडेगाव ग्रामपंचायतीच्या हद्दीत सर्वे नंबर 79 मध्ये ले – आउट पास झालेले असून, त्या लेआउट मधून वान प्रकल्पाचा लघु कालवा गेला आहे. या कालव्याच्या बाजूला असलेल्या वान प्रकल्पाच्या मालकीच्या हद्दीत कडूनिंबाची जवळपास आठ ते दहा फूट उंचीची तीस झाडे होती.अशा पद्धतीचा अहवाल गडेगाव तलाठी यांनी तहसीलदार तेल्हारा यांचेकडे दिलेला आहे.
गाडेगाव ग्रामपंचायतीने सुद्धा हि झाडे देखभाल व संवर्धनासाठी ग्रामपंचायतीकडे मिळावी याकरिता उपविभागीय अधिकारी वान प्रकल्प यांचेकडे सुद्धा अर्ज केलेला आहे. गावातील काही निसर्गप्रेमींनी केलेल्या विनंतीवरून हि झाडे वान प्रकल्पाच्या 7/12 मध्ये नोंद करण्यासंदर्भात तहसीलदार तेल्हारा यांनी गाडेगाव तलाठी यांना यापूर्वीच निर्देश दिलेले होते.परंतु मागील आठवड्यात लेआउट मधील काही झाडे तोडली . या अवैध वृक्षतोड संदर्भात दिनांक 21/ 5/ 2020 रोजी लेखी अर्जाद्वारे उपविभागीय अधिकारी अनिकेत गुल्हाने वान प्रकल्प तेल्हारा यांना कळविले होते व दोषींवर योग्य ती कार्यवाही करण्याची विनंती केली होती परंतु वान प्रकल्प अधिकारी यांनी या अवैध वृक्ष तोडीच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केल्यामुळे ग्रामपंचायत प्रशासनाने उपवनसंरक्षक वनविभाग अकोला यांच्याकडे योग्य त्या कार्यवाहीसाठी पर्यावरणदिनी तक्रार दाखल केली.