अकोला,दि.२ – कोरोना संसर्ग अकोला शहरात वाढत आहे. जिल्ह्याचा मृत्यूदरही जादा आहे. बाधीत रुग्णांचा मृत्यू होण्याचे एक प्रमुख कारण म्हणजे रुग्ण अगदी शेवटच्या क्षणाला दाखल होणे हे एक होय. म्हणून आपण आपल्या भागात वैद्यकीय सेवा देतांना कोरोना संसर्गाचे संदिग्ध लक्षणे आढळणाऱ्या रुग्णास तात्काळ शासकीय यंत्रणेकडे पाठवा असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले.
यासंदर्भात आज अकोला शहरातील खाजगी दवाखाने चालविणाऱ्या डॉक्टर्सची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात बोलावण्यात आली होती. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण, मनपाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. फारुख शेख, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे व खाजगी वैद्यकीय सेवा देणारे डॉक्टर्स उपस्थित होते.
कोरोना संसर्गाच्यादृष्टीने मधुमेह, हृदयरोग, उच्च रक्तदाब, तसेच किडनी वा अन्य आजार असणाऱ्या रुग्णांकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. त्यासाठी आपल्या कडे नेहमी येणाऱ्या रुग्णांची नावे नोंदवून ठेवावी. त्यांचेवर सतत लक्ष असू द्यावे. त्यांची शरिरातील ऑक्सिजन पातळी सतत मोजत रहावे. अशा रुग्णांचे संपर्क आधीच नोंदवून ठेवावे. अशा रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणे आढळल्यास त्यांना तात्काळ शासकीय यंत्रणेकडे पाठवावे. वेळीच उपचार सुरु झाल्यास कोरोनातून रुग्ण हमखास बरा होतो, ही बाब जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण यांनी सांगितली. तसेच आलेल्या रुग्णांचे संपर्क क्रमांकही नोंदवून घ्यावे, जेणे करुन आवश्यकता भासल्यास कामास येऊ शकतो, असेही सांगण्यात आले.