अकोला,दि.२ – राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, कामगार राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी आज डॉ.पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठातील कोवीड केअर सेंटरला भेट देऊन तेथे दाखल रुग्णांची भेट घेऊन विचारपूस केली.
तसेच तेथे प्रशासनाने केलेल्या सुविधांची पाहणी केली. यावेळी त्यांचे समवेत विधानसभा सदस्य आ. नितीन देशमुख, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण, उप विभागीय अधिकारी डॉ. निलेश अपार, मनपा आरोग्य अधिकारी डॉ. फारुख शेख, नोडल अधिकारी शेळके तसेच अन्य अधिकारी- कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी पालकमंत्री ना.कडू यांनी ज्या ज्या विभागांच्या समन्वयातून रुग्णांची व्यवस्था करण्यात आली आहे. त्या त्या विभागाच्या अधिकाऱ्यांना समक्ष विचारणा करुन त्यांच्या समोरच दाखल रुग्णांना विचारपूस करुन खात्री केली. यावेळी मनपाने दाखल केलेले रुग्ण, तसेच सौम्य लक्षणे असणारे रुग्ण, नमुने घेऊन अहवालांच्या प्रतिक्षेत असणारे रुग्ण यांसाठी करण्यात आलेल्या वेगवेगळ्या व्यवस्थांची पाहणी त्यांनी केली. रुग्णांना देण्यात येणारे पाणी, जेवण, भोजन गृह, तसेच त्यांच्या दैनंदिन स्वच्छतांची व्यवस्था याबाबतही पाहणी केली व रुग्णांकडून त्याची माहिती घेतली.