अकोला दि.१- महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ मर्यादीत, अकोला म्हणजेच महाबीज संस्थेमार्फत बाजारात आलेल्या सोयाबिन वाणाच्या प्रमाणित बियाण्याचे दर जास्त असल्याबाबतची चर्चा सुरु आहे. तथापि बियाण्यांची दरवाढ होण्यामागे गेल्या वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे सोयाबीनच्या उगवण क्षमतेत झालेली घट, बिजोत्पादक शेतकऱ्यांकडून खरेदी केलेल्या बियाण्याची वाढलेली किंमत व उगवण क्षमतेच्या निकषानुसार नापास झालेल्या बियाण्याची आलेली घट ही कारणे असल्याचे महाबीजच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
याबाबत महाबीजच्या वतीने प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकात म्हटले आहे की, सोयाबीन बियाणे विक्रीमध्ये महाबीजचा जवळपास 45% वाटा असुन, महाबीज उच्चतम दर्जाचे बियाणे शेतकऱ्यांना रास्त दरात मिळवून देण्यासाठी सदैव कसोशीने प्रयत्नशील आहे. सन 2019-20 मध्ये राबविलेल्या सोयाबीन बिजोत्पादन कार्यक्रमामध्ये पिक परीपक्वता अवस्थेत असताना महाराष्ट्र, मध्यप्रदेश या राज्यात जोरदार पाऊस झाल्याने सोयाबीन बियाण्याच्या उगवण शक्तीवर विपरित परिणाम झाला. परिणामतः खरीप-2020 हंगामामध्ये सोयाबीन प्रमाणीत बियाण्यांची तुटवडा सदृष परिस्थिती निर्माण झाली.
बियाणे मागणीची पूर्तता करण्यासाठी महाबीजव्दारे वेळोवेळी निविदा जाहीर करून तसेच प्रोराटा पद्धतीने पॅकींग करून बियाणे उपलब्ध करुन देण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत. सोयाबीन बिजोत्पादन खरेदी धोरणा प्रमाणे जिल्हानिहाय निवडक कृषि उत्पन्न बाजार समितीचे माहे डिसेंबर-2019 ते जानेवारी-2020 चे सरासरी दर अधिक प्रोत्साहनपर रक्कम या दराने शेतकऱ्यांकडुन खरेदी करण्यात आले. या कालावधीत बाजारात कमी माल आल्यामुळे कृषि उत्पन्न बाजार समितीचे दर खुप वाढलेले म्हणजेच रुपये 4400/- प्रति क्विंटल ते रुपये 4500/- प्रति क्विंटल या दरम्यान होते. खरीप-2019 हंगामात महाबीज सोयाबीन जेएस-335 बियाण्यांची विक्री किंमत रुपये 1500/- प्रति बॅग नसुन रुपये 1860/- प्रति बॅग एवढी होती. जी खरीप-2020 हंगामात रू.2250/- प्रति बॅग झाली. म्हणजे एकूण वाढ रू. 390/- प्रति बॅग एवढी येते. ही वाढ जवळ-जवळ 21% आहे.
बिजोत्पादकांकडून कच्चे बियाणे 21.5% वाढलेल्या दरात घेण्यात आले. या कच्च्या बियाण्यांतुन प्रक्रिया करताना तसेच उगवण क्षमता चाचणी मध्ये नापास बियाण्याची घट येते. या शिवाय बियाण्याची प्रक्रिया, पॅकींग, चाचणी इत्यादी तसेच नापास बियाण्याचा खर्च प्रमाणित बियाण्यांच्या किंमती मध्ये समाविष्ट केला जातो. मागील वर्षी परिपक्वतेच्या कालावधीत झालेल्या पावसामुळे नापास बियाण्याचे प्रमाण या वर्षी खुपच अधिक होते. या बाबींचा विचार करता, बाजारातील वाढलेले दर, नापास बियाण्याचे अधिक प्रमाण, तुटवडा सदृष परिस्थिती इत्यादी अपरिहार्य कारणांमुळे महाबीजच्या सोयाबीन बियाण्यामध्ये माफक प्रमाणात दर वाढ झालेली आहे, असे महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ मर्यादित महाबीजचे महाव्यवस्थापक (विपणन) यांनी कळविले आहे.