अकोला दि.३०- कोरोना संसर्गाच्या आपत्तीचा सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने आणखी ५३० खाटांची व्यवस्था निर्माण करुन ११ इमारतींमध्ये कोवीड केअर सेंटर म्हणून अधिग्रहित केल्या आहेत. या संदर्भात जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आज आदेश निर्गमित केले आहेत. यामुळे जिल्ह्यात कोविड केअर सेंटरच्या पुर्वीच्या ११३५ क्षमतेत वाढ होऊन आता १६६५ खाटांची क्षमता झाली आहे. संदिग्ध रुग्णांना संस्थागत अलगीकरणात ठेवण्यासाठी या सुविधेचा वापर करण्यात येतो.
यासंदर्भात जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी गुणवंत मुलांचे वसतीगृह(१०), गुणवंत मुलींचे वसतीगृह(२०), सैनिकी मुलांचे वसतिगृह(५०), सैनिकी मुलींचे वसतिगृह(३०) , शासकीय अध्यापक मुलांचे वसतीगृह(४०), शासकीय अध्यापक मुलींचे वसतीगृह(४०), जिल्हा परिषद कर्मचारी भवन(८०), आदिवासी मुलांचे वसतीगृह(८०), आदिवासी मुलींचे वसतीगृह(८०), जिल्हा क्रीडा प्रबोधिनी(५०), जिल्हा क्रीडा संकूल (५०) या इमारती कोवीड केअर सेंटर म्हणून अधिग्रहित करीत असल्याचे आदेश निर्गमित केले आहेत. या इमारती जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या ताब्यात देऊन कोवीड केअर सेंटर म्हणून निर्मिती करावी. या इमारती व परिसरात निरीक्षणाखाली ठेवण्यात येणाऱ्या व्यक्तींच्या कक्षात अन्य कोणासही आवश्यक नोंदींशिवाय प्रवेश करता येणार नाही. या क्षेत्रात कलम १४४ लागू करुन प्रतिबंधात्मक क्षेत्र म्हणून घोषित केल्याचेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.