अमरावती : कोरोना विषाणूमुळे उद् भवलेल्या टाळेबंदीच्या परिस्थितीत समाजातील दुर्बल, वंचित, उपेक्षित घटकांना दिलासा देण्यासाठी जिल्ह्यातील निराधार, वृध्द व्यक्ती, दिव्यांग, विधवा अशा 64 हजार 362 लाभार्थ्यांच्या बँक खात्यात संजय गांधी योजने अंतर्गत 19 कोटी 68 लाख रुपयांचे अनुदान थेट जमा करण्यात आला आहे. या लाभार्थ्यांना सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून अनुदानाची रक्कम बँकेमार्फत वितरीत करण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी आज दिली.
देशात व राज्यात कोरोना विषाणूमुळे निर्माण झालेली परिस्थिती विचारात घेता, केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दपकाळ निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजन, इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तीवेतन योजना तसेच राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेतील लाभार्थ्यांना माहे एप्रिल, मे व जून 2020 या तीन महिन्याच्या कालावधीचे अर्थसहाय्य एकत्रितपणे एप्रिल महिन्यात लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचे आदेश शासनाने दिले होते.
तसेच इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दपकाळ निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तीवेतन योजना या तीनही योजनेतील लाभार्थ्यांना उपरोक्तप्रमाणे नियमित अनुदानाव्यतिरिक्त एप्रिल व मे महिन्याचे रुपये पाचशे प्रती महिन्याचे सानुग्रह अनुदान मे महिन्यात वितरीत करण्याच्या सूचना शासनाकडून प्राप्त झाल्या होत्या. त्यानुसार जिल्ह्यात लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा करण्याची कार्यवाही होत आहे.
जिल्ह्यातील निराधार, वृध्द व्यक्ती, दिव्यांग, शारीरिक, मानसिक आजाराने रोगग्रस्त व्यक्ती, विधवा, घटस्फोटीत आदींना कोरोनाच्या संकटकाळात सहाय्यता व्हावी, या उदात्त हेतूने संजय गांधी निराधार योजने अंतर्गत 64 हजार 362 लाभार्थ्यांना 19 कोटी 68 लाख रुपये अनुदान संबंधितांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले आहे. श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती योजने अंतर्गत 1 लाख 76 हजार 791 लाभार्थ्यांना 59 कोटी 46 लक्ष अनुदान वितरीत करण्यात आले. इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दपकाळ निवृत्तीवेतन योजनेतून 63 हजार 679 लाभार्थ्यांना 10 कोटी 4 लक्ष रुपयाचे अनुदान वितरीत करण्यात आला आहे. इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजनेतून 2 हजार 35 लाभार्थ्यांना 37 लक्ष रुपये अनुदान तर इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तीवेतन योजनेतून 441 लाभार्थ्यांच्या बँक खात्यात 8 लाख रुपये अनुदान जमा करण्यात आले आहे.
इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दपकाळ निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तीवेतन योजना या तीनही योजनेच्या लाभार्थ्यांना प्रती माह पाचशे रुपये याप्रमाणे दोन महिन्याचे एक हजार रुपयेप्रमाणे जिल्ह्यातील 66 हजार 155 लाभार्थ्यांना 6 कोटी 41 लक्ष 52 हजार रुपये सानुग्रह अनुदान वितरीत करण्यात येत आहे. तसेच संजय गांधी निराधार योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तीवेतन योजनेतून जिल्हयातील 22 हजार 275 दिव्यांग बांधवांना 6 कोटी 68 लक्ष रुपयाचे अनुदान त्यांच्या खात्यात जमा करण्यात आले असून माहे एप्रिल, मे व जून करीता हा निधी वितरीत केला जाणार आहे. दिव्यांग लाभार्थ्यांचे एकत्रित अनुदान थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले आहे. यामुळे त्यांच्या आर्थिक अडचणी सोडविण्यासाठी मदत होणार आहे.
राज्यातील आर्थिक परिस्थिती नाजूक असतानाही सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत निधी मंजूर करण्यात आला आहे. राज्यातील निराधार, वृद्ध व्यक्ती, अंध, दिव्यांग, शारीरिक मानसिक आजाराने रोगग्रस्त, विधवा, अत्याचारित महिला, वेश्या व्यवसायातून मुक्त केलेल्या महिला, घटस्फोटित महिलांना अर्थसहाय्य देण्याच्या मूळ उद्देशाने संजय गांधी निराधार योजना 1980 पासून राज्यात राबविण्यात येत आहेत. कोरोनाच्या संकटकाळात समाजातील गरीब, वंचित, निराधार, विधवा, दिव्यांग, ज्येष्ठ नागरिकांना या माध्यमातून दिलासा देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे.