अकोला दिनांक २८- कोरोना या आजाराची श्रृंखला तोडायची असेल तर त्यासाठी केवळ शासन प्रशासकीय यंत्रणा यांना जबाबदार धरुन चालणार नाही. त्यासाठी आपल्या सगळ्यांना राजकीय पक्ष, गट तट बाजूला ठेवून एकत्र यावं लागेल. आपण एकजुटीने प्रशासन राबवित असलेल्या उपाययोजनांना साथ देऊ आणि कोरोनाची श्रृंखला मोडून काढू. ही श्रृंखला मोडण्यासाठी आवश्यकता भासल्यास शासनाच्या मान्यतेने दि.१ ते ६ जून या कालावधीत जनता कर्फ्यू म्हणून स्वयंस्फूर्तीने लॉक डाऊनही पाळू. या एकजुटीनेच ‘जिंकू, हाच आत्मविश्वास’ बाळगुन लढू, असा निर्धार राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, कामगार राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी आज सर्वपक्षीय बैठकीत व्यक्त केला.
अकोला जिल्ह्यात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमिवर आज सर्वपक्षिय विचारविनिमय बैठक बोलावण्यात आली. नियोजन सभागृहात ही बैठक पार पडली. या बैठकीस जिल्हा परिषद अध्यक्ष प्रतिभाताई भोजने, महापौर अर्चनाताई मसने, विधान परिषद सदस्य आ. गोपिकिशन बाजोरिया, आ. डॉ. रणजित पाटील, आ. अमोल मिटकरी, विधानसभा सदस्य आ. गोवर्धन शर्मा, आ. रणधीर सावरकर, आ. नितीन देशमुख तसेच जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार, पोलीस अधिक्षक अमोघ गावकर, अपर जिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर, मनपा आयुक्त संजय कापडणीस, आरोग्य उपसंचालक डॉ. फारुकी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. कुसुमाकर घोरपडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले, डॉ. श्यामसुंदर शिरसाम, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, उपविभागीय अधिकारी डॉ. निलेश अपार तसेच अन्य अधिकारी कर्मचारी व सर्वपक्षीय प्रतिनिधी, पत्रकार उपस्थित होते.
यावेळी सर्वपक्षिय कार्यकर्त्यांनी आपापल्या भूमिका मांडतांना सद्यस्थितीतून बाहेर पडण्यासंदर्भात उपाययोजनांबाबत मार्गदर्शन करावे असे आवाहन पालकमंत्री ना. बच्चू कडू यांनी केले. त्यानुसार विविध पक्षाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी आपापल्या भुमिका मांडल्या. त्यात प्रामुख्याने सर्वांची सरसकट आरोग्य तपासणी मोहिम राबविणे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात दिल्या जाणाऱ्या सुविधांमध्ये सुधारणा व्हावी, केरळ सारख्या राज्यातील उपाययोजनांच्या अभ्यास करुन त्याप्रमाणे उपाययोजना राबवाव्या अशी मते मांडण्यात आली. तसेच पुन्हा एकदा काही कालावधीसाठी कडेकोट लॉकडाऊन पाळावा, अशा उपाययोजना सुचविण्यात आल्या. उपस्थित लोकप्रतिनिधींनी आपापली मते मांडली.
यावेळी बोलतांना,
जिल्हा परिषद अध्यक्ष प्रतिभाताई भोजने म्हणाल्या की, कोरोनाचा शहरी भागातून ग्रामिण भागात शिरकाव होऊ लागला आहे. त्यासाठी ग्रामिण आरोग्य यंत्रणा बळकट करणे अत्यंत आवश्यक आहे. लोकांना अधिक चांगली आरोग्य सेवा देता यावी यासाठी प्रशासनाने चांगली कामगिरी करावी.
आ. गोवर्धन शर्मा म्हणाले की, प्रशासनाने विविध उपाययोजना जसे लॉकडाऊन आदींची अंमलबजावणी करत असतांना लोकप्रतिनिधींची मते विचारात घ्यावीत.
आ. नितीन देशमुख यांनी होत असलेल्या उपाययोजना राबविण्याची त्यासाठी प्रशासनाला सहकार्य करण्याची जबाबदारी लोकप्रतिनिधींची ही आहे. हे जगावर आलेलं संकट आहे. त्याचा सामना करण्याची जबाबदारी एकट्या शासन व प्रशासनाची नसून लोकप्रतिनिधींचीही तितकीच जबाबदारी आहे. लोकांनींही दक्षता बाळगावी. ही वेळ एकमेकांची उणी दुणी काढण्याची नसून एकजुटीने काम करण्याची आहे, असे आवाहन केले.
आ. गोपीकिशन बाजोरिया म्हणाले की, प्रशासन प्रयत्न करीत आहे. त्यांना आपण साथ दिलीच पाहिजे. एकीकडे रुग्ण संख्या वाढत असल्याचे दिसत असले तरी आपल्या जिल्ह्यातील चाचण्यांची संख्या आणि बरे झालेल्या रुग्णांची संख्याही चांगली आहे. आतापर्यंअत ६६ टक्क्यांहून अधिक रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. कोरोनामुळे लोकांच्या मनात निर्माण झालेली भिती दुर करणे आवश्यक आहे. आपण सारेजण त्यासाठी पक्षभेद विसरुन एकजुटीने प्रयत्न करु.
आ. रणधीर सावरकर म्हणाले की, रुग्णाचा स्वॅब चाचणी साठी घेतल्यानंतर ते त्याचा अहवाल येईपर्यंत त्याला क्वारंटाईन करुन ठेवावे. रुग्णांच्या संपर्कातील लोकांनाही क्वारंटाईन करा. पोलीस दलाच्या मदतीला राज्य राखीव पोलीस दलाच्या तुकड्यांची मदत घ्या, असे सांगितले. शिवाय मनपा हद्दीत पुन्हा एकदा संपूर्ण लॉकडाऊन घोषित करा. वैद्यकीय उपचारांच्या वेळी अधिकाऱ्यांनी रुग्णांशी संवेदनशीलतेने वागावे, अशी सुचनाही त्यांनी केली.
आ. डॉ. रणजीत पाटील म्हणाले की, प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर भर देऊन संसर्ग फैलावणार नाही यासाठी उपाययोजना राबवाव्या. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात तातडीने वैद्यकीय सेवा देण्यासाठी कंत्राटी पद्धतीने कर्मचारी नेमणुकीबाबत कार्यवाही करावी. तसेच कोवीडच्या नावाखाली अन्य शासकीय कार्यालयांनी कामे बंद ठेवू नका. शेतकऱ्यांसाठी महत्वाचे दिवस आहेत. त्यांची कामे प्राधान्यक्रम ठरवून वेळेत पूर्ण करा.
आ. अमोल मिटकरी म्हणाले की, नागरिक म्हणून पक्षभेद विसरुन सगळ्यांनी एकत्र येणं महत्त्वाचं आहे. लॉक डाऊन पाळत असतांना नागरिकांना दैनंदिन वस्तूंचा पुरवठा करण्यासाठी स्थानिक नगरसेवक व सेवाभावी संस्थांच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून घरपोच सेवा पुरवा. चाचण्यांची क्षमता वाढवून त्यासाठी लागणारा कालावधी कमी करा. निकाल हातात मिळेपर्यंत लक्षणांनी युक्त व लक्षणे न आढळणारे सर्व रुग्ण एकत्र ठेवू नका त्यांना वेगळे ठेवा.
जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर म्हणाले की, जिल्हा प्रशासन आता रुग्णांच्या निकट संपर्कातील व्यक्तिंना क्वारंटाईन करणार. त्यानंतर पाच दिवसांनी लक्षणे दिसली तरच चाचणी करणार. तसेच रुग्ण वाढ दुप्पट होण्याचा दर व मृत्यूचा दर रोखण्यासाठी प्रशासन प्रयत्न करीत आहे. आता घरोघरी तपासणीची मोहिम हाती घेण्यात येत आहे. त्यात प्रत्येक घरातील प्रत्येक व्यक्तीची तपासणी करण्यात येईल. त्यासाठी नागरिकांनी प्रशासनाला व आरोग्य यंत्रणेला सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.
पालकमंत्री ना. बच्चू कडू म्हणाले की, कोरोना हा न दिसणारा शत्रू आहे. नागरिकांनी दैनंदिन जीवन जगतांना केलेली एखादी लहानशी चुकही कोरोनाचा संसर्ग वाढण्यासाठी कारणीभूत ठरु शकते. संसर्ग असलेल्या दोन व्यक्ती बेजबाबदारपणे वागल्या तर त्या दिडशे जणांना लागण करु शकतात. कोरोना विरुद्धचं हे युद्ध आपल्याला जिंकायचं आहे. त्यासाठी लढणाऱ्याचा प्रामाणिकपणा महत्वाचा आहे. कदाचित या आजारासोबत जगणं ही शिकावं लागेल. आता नागरिकांनी स्वतः स्वतःचे रक्षक व्हावे. आपल्या सवयी बदला. मानसिकता बदला. अकोला जिल्ह्यात रुग्ण संख्या वाढली असली तरी या जिल्ह्यात चाचण्याही सर्वाधिक झाल्या आहेत. सर्वपक्षियांच्या सुचनेचा विचार करुन दि. एक ते सहा जून दरम्यान पुन्हा एकदा जनता कर्फ्यू म्हणून स्वयंस्फूर्तीने कडकडीत लॉकडाऊनही पाळू. त्यासाठी शासनाची मान्यता घेऊ.
या सोबतच प्रशासनाच्या सर्व विभागांनी ज्यापद्धतीने येथील परिस्थिती हाताळली आहे, त्याचे मुल्यमापन करुन त्याचा अहवाल शासनाला पाठविण्यात येईल. परिस्थिती हाताळण्यात कुणी दोषी असेल तर त्यावर कारवाई केली जाईल. आता सध्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व कोविड केअर सेंटर मध्ये व्हिडीओ गस्त पथक कार्यरत ठेवले जाईल. पोलिसांनी नियमभंग करणाऱ्यांवर कारवाई करावी. नियमभंग करणारा कुणीही असला तरी कारवाई करावी, असे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले. कोरोना या जागतिक महामारीच्या विरोधात लढत असतांना जिंकूच हा आत्मविश्वास महत्त्वाचा आहे. त्या विश्वासाने साऱ्यांनी एकजुटीने कोरोनाला हरवू या, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी झालेल्या चर्चेत माजी आमदार बबनराव चौधरी, धैर्यवर्धन पुंडकर, बुढन गाडेकर, पंकज साबळे, माजी महापौर विजय अग्रवाल, अरुंधती शिरसाठ, सिद्धार्थ शर्मा, पराग गवई, शाम राऊत, गजानन पुंडकर आदींनी सहभाग घेतला.
शेवटी निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
जनता कर्फ्यूच्या परवानगीसाठी मुख्यसचिवांना प्रशासनाचे पत्र
दरम्यान दि.१ ते ६ जून या कालावधीत जिल्ह्यात स्वयंस्फूर्तीने जनता कर्फ्यू म्हणून लॉक डाऊन पाळण्यासंदर्भात सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींच्या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयाबाबत मुख्यसचिवांच्या मान्यतेसाठी पत्र पाठवण्यात आले आहे, असे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी सांगितले.