मुंबई: विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काल पत्रकार परिषद घेऊन केलेल्या दाव्यांना आज महाविकास आघाडी सरकारनं प्रत्युत्तर दिलं. केंद्राकडून राज्याला भरीव मदत मिळाली. मात्र तरीही राज्य सरकार अपयशी ठरलं, असं फडणवीस यांनी म्हटलं होतं. त्यांनी दिलेल्या आकडेवारीचा राज्य सरकारच्या मंत्र्यांनी समाचार घेतला. शिवसेनेचे अनिल परब , राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत पाटील आणि काँग्रेसचे बाळासाहेब थोरात यांनी फडणवीस यांना जोरदार प्रतुत्तर दिलं.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काल आभासी पत्रकार परिषद घेतली. आम्ही प्रत्यक्ष उत्तर देतोय. आम्ही आभास निर्माण करत नाही. प्रत्यक्ष उत्तर देतो. केंद्र सरकार महाराष्ट्राला मदत करतंय. तरी राज्य सरकार अपयशी ठरतंय, असा फडणवीस यांच्या पत्रकार परिषदेचा मतितार्थ होता. मात्र ते आकडेवारीतून गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत, अशा शब्दांत शिवसेना नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांनी जोरदार पलटवार केला. केंद्राकडून राज्याला गहू, तांदूळ आणि डाळ मिळाल्याचं फडणवीस यांनी सांगितलं. केंद्रानं संपूर्ण देशाला अन्नधान्य दिलं. एकट्या राज्याला नाही. त्यातही १७५० कोटी रुपयांचा गहू राज्याला मिळालेला नाही. १२२ कोटींचं अन्नधान्य स्थलांतरित मजुरांना दिल्याचं फडणवीस सांगतात. त्याचे आदेश चार दिवसांपूर्वी निघाले आहेत आणि बहुतांश मजूर त्यांच्या गावी परतले आहेत. पंतप्रधान किसान सन्मान योजनेतून १७२६ कोटींचा निधी दिल्याचं फडणवीस म्हणाले. पण ही योजना आजची नाही. आधीपासूनची आहे. कोरोना काळात केंद्रानं कोणतीही वेगळी मदत राज्याला केलेली नाही. यापेक्षा वेगळी मदत फडणवीस यांनी केंद्राकडून आणली असती, तर आम्ही त्यांचं अभिनंदनच केलं असतं, असा टोला परब यांनी लगावला.
देवेंद्र फडणवीस केवळ फुगवून आकडे सांगतात, असा दावा करत अनिल परब यांनी विधवा, दिव्यांग, ज्येष्ठ नागरिकांना केंद्राकडून देण्यात आलेल्या ११६ कोटी रुपयांचा संदर्भ दिला. विधवा, दिव्यांग, ज्येष्ठ नागरिकांना मिळणाऱ्या मदतीचा केवळ २० टक्केच हिस्सा केंद्र देतं. बाकीचा ८० टक्के हिस्सा राज्य सरकार देतं. केंद्र ११६ कोटी देत असताना राज्यानं १ हजार २१० कोटी दिले, हे फडणवीस यांनी सांगायला हवं होतं, असं परब म्हणाले. सध्या केंद्र आणि राज्य सरकारमध्ये मजुरांसाठी सोडल्या जाणाऱ्या श्रमिक विशेष गाड्यांवरून वाद सुरू आहे. त्यावरूनही परब यांनी फडणवीस यांना लक्ष्य केलं. महाराष्ट्रातून ६०० गाड्या सुटल्या. प्रत्येक गाडीवर ५० लाख खर्च केले, असं फडणवीस सांगतात. एका ट्रेनला ५० लाखांचा खर्च कसा आणि कुठून येतो, याचं उत्तर फडणवीस यांनी द्यावं, असं परब यांनी म्हटलं. राज्य सरकारनं ८० ट्रेन मागितल्या. पण रेल्वे मंत्रालयानं त्या दिल्या नाहीत, याचा पियूष गोयल यांना इतका राग आला की त्यांनी १५२ गाड्या एकाच दिवसात दिल्या. बंगालसाठी आम्हाला महिन्याभरात ४८ गाड्या सोडायच्या आहेत. दिवसाला दोन गाड्याच पाठवा, अशी विनंती बंगाल सरकारनं वादळाच्या पार्श्वभूमीवर केली आहे. मात्र तरीही एकाच दिवशी ४३ गाड्या पाठवून गर्दी निर्माण केली आणि कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न केला, असा गंभीर आरोप परब यांनी केला.