स्थलांतरीत मजुरांसाठीच्या विशेष रेल्वेगाड्यांवरून रेल्वे मंत्रालय आणि महाराष्ट्र सरकार सध्या आमनेसामने आले आहेत. रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी विशेष गाड्यांवरून राज्य सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. मात्र दुसरीकडे रेल्वे खात्याचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे. काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशमधील गोरखपूरला जाणारी रेल्वे चुकन ओदिशामधील रूरकेला येथे पोहोचल्याची घटना ताजी असतानाच आता पुन्हा एकदा उत्तर प्रदेशकडे जाणारी एक रेल्वे रस्ता भरकटून नागपूरला पोहोचल्याचे उघड झाले आहे. लॉकडाऊनमुळे वास्तव्याचा आणि रोजगाराचा प्रश्न निर्माण झालेल्या स्थलांतरीत मजुरांसाठी केंद्र सरकारकडून विशेष ट्रेन चालवण्यात येत आहेत. मात्र या ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या मजुरांना सुखकर प्रवासापेक्षा त्रासच अधिक सहन करावा लागत आहे. ट्रॅकवर दिशाहीनपणे धावत असलेल्या रेल्वेगाड्या आपल्या अंतिम स्थानकापर्यंतचा प्रवास पूर्ण करण्यासाठी तीन-चार दिवस लावत आहेत. दरम्यान, स्थलांतरीत मजुरांना घेऊन गोव्यावरून उत्तर प्रदेशमधील बलियाकडे निघालेली एक श्रमिक स्पेशल ट्रेन मार्ग भरकटून नागपूरला पोहोचल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यामुळे जो प्रवास २८ तासांत पूर्ण होणे अपेक्षित होते. त्यासाठी तब्बल ७२ तास लागल्याचे समोर आले आहे. ही ट्रेन गुरुवारी गोव्यामधून उत्तर प्रदेशमधील बलियाच्या दिशेने निघाली होती. गोवा ते बलिया हे अंतर २ हजार २४५ किमी आहे. त्यामुळे या प्रवासासाठी २८ तास लागतात. मात्र मार्ग भरकटून ही ट्रेन नागपूरला गेली त्यामुळे बलियाला पोहोचण्यासाठी ७२ तास लागले. अखेरीस तीन दिवसांच्या प्रवासानंतर ही ट्रेन बलिया येथे पोहोचली.