मुंबई : महाविकास आघाडी सरकारमध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री असलेल्या अशोक चव्हाणांना कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी अशोक चव्हाण हे मुंबईतून नांदेडला गेले होते. तिथे त्यांनी कोरोना चाचणी केली असता काल त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला.विधान परिषद निवडणुकीसाठी गेल्या काही दिवसांपूर्वी ते मुंबईला आले होते. या निवडणुकीनंतर ते पुन्हा नांदेडला परतले. नांदेडला येऊन त्यांनी स्वत: होम क्वारंटाइन करून घेतलं होतं. त्यांनी कुटुंबापासून स्वत:ला वेगळं ठेवलं होतं. नांदेडमधील रुग्णालयात त्यांचे स्वॅब तपासणीसाठी घेतले असता, त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यानंतर ते उपचारासाठी आज नांदेडहून मुंबईकडे रवाना झाले आहेत. अशोक चव्हाण मुंबईत पोहोचतील. त्यानंतर मुंबईतील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार केले जातील.