अकोला,दि.२३ – कोरोना प्रादुर्भावाचे वाढते स्वरुप व त्यानुषंगाने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात तपासणी व उपचार सुविधांचे सुसुत्रीकरण करुन अधिक दर्जेदार सेवा देण्यासाठी जिल्हा प्रशासनातील अपर जिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रशासक म्हणून अतिरिक्त कार्यभार देण्यात आले असल्याबाबत जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आदेश दिले आहेत.
यासंदर्भात दिलेल्या आदेशात म्हटले आहे की, दिवसेंदिवस वाढत असणारी रुग्ण संख्या पाहता सोयीसुविधांचे व्यवस्थापन व्हावे यासाठी अपर जिल्हाधिकारी लोणकर यांना प्रशासक म्हणून नेमण्यात आले आहे. तसेच त्यांच्या सहाय्यासाठी जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजिव फडके, महिला बालकल्याण अधिकारी जवादे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रशासकीय अधिकारी संजय देशमुख आणि डॉ. नेताम या अधिकाऱ्यांची कुमक ही देण्यात आली आहे. हे सर्व अधिकारी अपर जिल्हाधिकारी लोणकर यांच्या निर्देशानुसार काम करुन सेवा सुविधांचे उत्तम व्यवस्थापन करतील.
अपर जिल्हाधिकारी लोणकर हे प्रशासक म्हणून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता यांच्याशी समन्वय ठेवून काम करतील. लोणकर व त्यांच्या चमूने वैद्यकीय उपचारांव्यतिरिक्त अन्य सर्व सेवांचे व्यवस्थापन करावयाचे आहे. तसेच आवश्यकतेनुसार खाजगी डॉक्टर्सच्या सेवा अधिग्रहित करणे, रुग्णांना देण्यात येणाऱ्या सुविधा, भोजन इ. दर्जात सुधारणा करणे, कोवीड वार्ड मधील स्वच्छता निर्जंतुकीकरण सेवा, आवश्यकतेनुसार परिचारिका, वार्ड बॉय, स्वच्छता कर्मचारी इ. नियुक्ती करणे इ. बाबी हाताळाव्यात व प्रशासनीक सुधारणा करुन अहवाल सादर करावा, असे आदेशात म्हटले आहे. तसेच प्रशासनीक व्यवस्थेच्या बळकटीकरणासाठी अपर जिल्हाधिकाऱ्यांची नियुक्ती असून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता यांची मुळ जबाबदारी मात्र कायम राहणार आहे, असेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.