बुलडाणा : कोरोना संसर्गाच्या पृष्ठभूमीवर सुरू असलेल्या लॉकडाउनमुळे २२ मार्च ते २१ मे या कालावधीत एसटी बस आगारातच होती. आता लॉकडाउनच्या अटी शिथील करण्यात आल्याने तब्बल दोन महिन्यांच्या विश्रांतीनंतर २२ मे रोजी लालपरी प्रवाशांना घेवून रस्त्यावर धावताना दिसून आली. बुलडाणा विभागातील सातही आगारांमधून जिल्ह्यातंर्गत बसफेºया सोडण्यात आल्या. पहिल्या दिवशी प्रवाशांचा अल्प प्रतिसाद मिळाल्याची माहिती विभागीय वाहतुक नियंत्रकांनी दिली.
सर्वसामान्यांना प्रवास करणे सोयीचे व्हावे, यादृष्टीने शासनाने काही अटी, शर्थी ठेवत जिल्ह्यातंर्गत बससेवा सुरू करण्यास मुभा दिली आहे. यानुसार जिल्ह्यात २२ मे पासून सातही आगारांमधून ठरलेल्या नियोजनानुसार बस सोडण्यात आल्या. सुरुवातीला बसस्थानक व बसचे निर्जंतुकीकरण करण्यात आले. प्रवाशांना सॅनीटायझरचा वापर करण्यासह मास्क लावूनच बसमध्ये प्रवेश देण्यात आला. बुलडाणा आगारातून सकाळी ७ वाजता शेगाव येथे एक बस सोडण्यात आली. या बसमध्ये १० प्रवासी होते. पहिल्या दिवशी जिल्ह्यातील सर्व आगारांमध्ये अल्प प्रतिसाद मिळाला. एका गाडीमध्ये क्षमतेच्या ५० टक्के प्रवासी बसविण्याची परवानगी देण्यात आली असली तरी केवळ दोन किंवा तीन प्रवाशांनीच प्रवास केला. काही ठिकाणी तर प्रवासीच नसल्याने अनेक बस रिकाम्याच सोडण्यात आल्या. कोरोना विषाणू संसर्गाच्या भितीने नागरिकांनी एसटी बसने प्रवास टाळल्याचे चित्र पहिल्या दिवशी दिसून आले.
अधिक वाचा: उद्यापासून अकोला जिल्हयातील या आगारामधून धावणार लालपरी,नियमांचे करावे लागणार पालन