जगभरात कोरोना विषाणूने अक्षरश: थैमान घातले आहे. या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस अधिकच वाढत आहे. तर मागील २४ तासांत देशात तब्बल ६ हजार ०८८ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर १४८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशात कोरोना रुग्णांची संख्या १ लाख १८ हजारांपेक्षा अधिक वाढली आहे. शुक्रवारी आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या माहितीनुसार आता एकूण रुग्णांची संख्या १ लाख १८ हजार ४४७ आहे. यापैकी १ हजार ५८३ लोकांनी आपला जीव गमावला आहे. तर आतापर्यंत ४८ हजार ५३४ लोकं बरे झाले आहेत.
दरम्यान, देशात तिसरे लॉकडाऊन ३ मे रोजी संपले आणि चौथे लॉकडाऊन ४ मे पासून सुरु झाले. त्यानंतर या लॉकडाऊनमध्ये कोरोना रुग्णांमध्ये मोठ्या संख्येने वाढ झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून रुग्णांची संख्या दररोज ५ हजारांच्या पुढे जात आहे. बुधवारीही ५ हजार ६११ रुग्ण वाढले होते. तर गुरुवारी ५ हजार ६०९ रुग्ण वाढले होते. तर सध्या देशात ६६ हजार ३३० रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
एका दिवसात ६ हजार नवे रुग्ण
देशात कोरोनाच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ होत आहे. गेल्या २४ तासांत तब्बल ६ हजार ०८८ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे.
महाराष्ट्राची रुग्णसंख्या
महाराष्ट्रात सर्वाधिक म्हणजे ४१ हजार ६४२ रुग्ण आहेत. २४ तासांत २ हजार ३४५ रुग्ण वाढले आहेत. गुजरातमध्ये एकूण १२ हजार ९१० रुग्ण आहेत. तर २४ तासांत ३७१ रुग्ण येथे वाढले आहेत. तर तामिळनाडूमध्ये १३ हजार ९६७ पेक्षा जास्त रुग्ण आहेत. २४ तासांत ७७६ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे.