बुलडाणा : कोरोना विषाणू संसर्गामुळे राज्यात निर्माण झालेल्या आपत्कालीन परिस्थितीमुळे साथरोग अधिनियम लागू करण्यात आला आहे. भारत सरकारच्या आरोग्य आणि कुटूंब कल्याण मंत्रालयाच्या 15 एप्रिल 2020 च्या पत्रानुसार मागील 28 दिवसापासून जर एकही नविन कोविडचा रूग्ण आढळून आला नाही, तर सदरचा कंटेन्टमेंट झोन कमी करण्यात येतो. त्यानुसार जिल्ह्यात कोरोना रूग्ण आढळून आलेल्या क्षेत्रामध्ये कंटेन्टमेंट झोन जाहीर करण्यात आले होते. जिल्ह्यात एकूण 13 झोन आहेत.
त्यापैकी 7 झोनमध्ये मागील 28 दिवसांत एकही कोविडचा रूग्ण आढळून न आल्यामुळे हे झोन वगळण्यात आले आहेत. त्यामध्ये जुना गांव बुलडाणा, हकीम कॉलनी देऊळगांव राजा, चितोडा ता. खामगांव, इदगाह प्लॉट शेगांव, कुरेशी गल्ली सिंदखेड राजा, तहसिल कार्यालय परीसर मलकापूर आणि आंबेडकर नगर देऊळगांव राजा या झोनचा समावेश आहे.
या कंटेन्टमेंट झोनमधून वगळण्यात आलेले क्षेत्र पुढील आदेशापर्यंत ऑरेंज झोन म्हणून निश्चित करण्यात येत आहे. त्यामुळे शासनाने वेळोवेळी ऑरेंज झोनसाठी दिलेल्या आदेशामध्ये लागू असणारे सर्व नियम, अटी व शर्ती सदर क्षेत्रासाठी लागू राहणार आहेत, असे जिल्हादंडाधिकारी यांनी आदेशान्वये कळविले आहे.
अधिक वाचा: जळगांव जामोदच्या रूग्णाची कोरोनावर मात..!