मूर्तिजापूर : शहरातील एका प्रतिष्ठित व्यक्तीचा १३ मे रोजी मृत्यू झाला होता. संचारबंदी व जमावबंदी असतानाही त्यांच्या अंत्ययात्रेत शेकडो लोक उपस्थित होते. या व्यक्तीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने शहरात खळबळ उडाली आहे. अंत्ययात्रेत सहभागी होऊन जमावबंदी व संचारबंदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिसांनी शहरातील २५ जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
शहरातील एका व्यक्तीचा १३ मे रोजी सर्वोपचार रुग्णालय, अकोला येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. सर्वोपचार रुग्णालयामध्ये त्यांचे स्वॅब नमुने घेण्यात आले होते. तसेच या व्यक्तीच्या पार्थिवावर १४ मे रोजी अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी अंत्ययात्रेत शेकडो नागरिक सहभागी झाले होते. यामुळे संचारबंदी व जमावबंदीच्या आदेशाची पायमल्ली तसेच कलम १४४ चा भंग केल्याप्रकरणी अंत्ययात्रेत सहभागी झालेल्या फोरोज खा इनायत खा, सैयद नौशाद सय्यद नासीर, अब्दुल तोहीद, अजुमोद्दीन कुतुबोद्दीन, अहमद अयूब अहमद नासीर, नासिरोद्दीन जमिरोद्दीन, गुलाम हबीब गुलाम मुस्तफा, वसिमोद्दीन निराजोद्दीन व अब्दुल मतीन अब्दुल जब्बार यांच्यासह २५ लोकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जमावबंदी असताना फिजिकल डिस्टन्सिंग न पाळणे, कोणतीही काळजी न घेणे, जमाव करणे व नियमांचा भंग करून कलम १४४ चे उल्लंघन केल्याप्रकरणी पोलीस हेड कॉन्स्टेबल आसीफ अली यांच्या फिर्यादीवरून भादंवि कलम १८८ व २६९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास शहर पोलीस करीत आहे.
अधिक वाचा: पातूर येथे दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी पहिला वेबिनार, किड्स पॅरडाईज चा उपक्रम