पुणे, दि. 20 – कोरोना काळात केंद्र आणि राज्य सरकार अपयशी ठरले असून हे सरकार गरिबांचे नसून श्रीमंतांचे असल्याची टीका करतानाच मोदींनी कोरोनाला भारतात आणले असून कोरोनामुळे मृत कुटुंबियांच्या नातेवाईकांनी मोदींवर 302 चा गुन्हा दाखल करावा, त्याचबरोबर मंदिरांमधील सर्व पैसा ताब्यात घेऊन गोरगरिबांसाठी वापरावा, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे.
कोरोनाचा जगात प्रादुर्भाव झाल्यानंतर जानेवारीपासूनच लॉकडाऊनची प्रक्रिया सुरू झाली. मात्र भारतात हे करायला मार्चचा तिसरा आठवडा उजाडला. परदेशातून येणाऱ्या लोकांची योग्य तपासणी करून त्यांना 14 दिवस कोरोन्टाईन केले असते तर भारतात कोरोना पसरला नसता. याला मोदी सरकार जबाबदार असून कोरोनामुळे ज्यांचा मृत्यू झाला आहे, त्यांच्या कुटुंबीयांनी मोदींविरोधात 302 चा गुन्हा दाखल करावा, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. लॉक डाऊन करण्यापूर्वी मजुरांना त्यांच्या घरी पाठवून दिले असते तर आज मजुरांवर उपासमारीची वेळ आली नसती, यात अनेक मजुरांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात वंचित बहुजन आघाडी सामील असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले. कोरोनामुळे सर्वांचे जनजीवन विस्कळीत झाले असून ते दुरुस्त करण्याच्या स्थितीमध्ये हे सरकार दिसत नाही. संकटावर संकट येणार असून त्याचबरोबर श्रीमंतांची श्रीमंती वाढणार आहे, तर गरिबाला अजून गरीब कसे करता येईल हे covid-19 मध्ये व्यवस्थित करण्यात आले आहे. ग्रामीण भागात अद्यापही कोरोनाचा प्रादुर्भाव झालेला नाही, अश्या ठिकाणी ही लॉकडाऊन करण्यात आले आहे. लोकांचा टॅक्स मधून येणारा पैसा हा ग्रामीण भागात वापरायचा असतो. प्रत्येक मजुराला काम मिळाले पाहिजे १० हजार कोटींची गंगाजळ ही टॅक्स मधून ग्रामीण भागासाठी येते ते पैसे वापरण्यात आले पाहिजे, जेणेकरून ग्रामीण भागातील लोकांवर उपासमारीची वेळ येणार नाही. मात्र या ठिकाणी सरकार दिसत नाही, कुठे आहे सरकार असा प्रश्न आंबेडकर यांनी केला आहे. याचा विचार सरकारने गांभीर्याने केला पाहिजे, मधल्या काळात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे काही मुद्दे मांडून सरकारला तसे पत्र ही दिले होते. ते पत्र संबंधित विभागाला गेल्याचे आम्हाला सांगण्यात आले, मात्र त्यावर अंमलबजावणी अद्यापही कुठेच झाली नसल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले. केंद्र सरकारने नुकतीच पॅकेजची घोषणा केली आहे, हे पॅकेज खोटे, फसवे आहे. बोलाचीच कढी आणि बोलाचा भात असल्याचे त्यांनी सांगितले. मोदींनी या देशाची अर्थव्यवस्था पूर्णपणे उध्वस्त केली आहे. मंदिरांकडे जो पैसा आहे तो गरीब माणसांच्या उपजीविकेसाठी खर्च करावा, देवळातला पैसा हा सरकारचा पैसा आहे आणि देशातील देवळे ही सरकारची आहेत,सरकारने हिम्मत दाखवावी आणि सर्व पैसा ताब्यात घेऊन लोकहितार्थ त्याचा वापर करावा, असेही शेवटी प्रकाश आंबेडकर म्हणाले. वंचित बहुजन आघाडीचे प्रसिद्धी प्रमुख सुरेश नंदिरे यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती दिली