तेल्हारा (प्रतिनिधी)- कोरोना या जागतिक महामारी मुळे संपूर्ण भारतात लॉकडाऊन सुरू असून कोरोनाचा प्रसार होऊ नये म्हणून शासनाद्वारे सर्व प्रकारच्या धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक, सार्वजनिक, कार्यक्रमांवर अनेक महिन्यांपासून बंदी आणलेली आहे. सध्या लॉक डाउन ठेवणे ही देशाची गरज असल्यामुळे प्रचंड आर्थिक नुकसान सहन करूनही सर्व बिछायत मंडप डेकोरेशन कॅटरिंग इत्यादी व्यावसायिकांनी आपली प्रतिष्ठाने बंद ठेवून शासनाला पूर्ण सहकार्य केले आहे.
या व्यावसायिकांसाठी लग्न समारंभ आणि इतर शुभ कार्यामुळे उन्हाळा हा सर्वात मोठा सिझन असतो ह्या सीझनची पूर्वतयारी म्हणून बिछायत व्यवसायिक वर्षानुवर्षे कठीण परिश्रम आणि घाम गाळून उभारलेल्या भांडवलातून आणि अथवा परिचित व्यक्तींकडून उसने पैसे घेऊन लक्षावधी रुपयांचे साहित्य आणून ठेवतात प्रसंगी त्यांना बँकांचे मोठे कर्ज घेऊन सुद्धा साहित्य खरेदी करावी लागते. परंतु लॉकडाउन मुळे आणि सार्वजनिक कार्यक्रमांवरील बंधनांमुळे प्रत्येक बिछायत मंडप डेकोरेशन व्यावसायिकांचे लक्षावधी रुपयांचे नुकसान झाले असून त्यांचे पूर्णपणे आर्थिक कंबरडे मोडले आहे. त्यामुळे त्यांना बँकांचे कर्ज भरणे कठीण झाले आहे.
एवढेच नव्हे तर बिछायत व्यावसायिकांकडे असलेल्या मजूर बांधवांवर कामाअभावी उपासमारीची वेळ आलेली आहे. ह्या सर्व परिस्थितीचा विचार करता शासनाने सर्व बिछायत मंडप डेकोरेशन व्यवसायिक आणि त्यांच्याकडे असलेल्या मजूरवर्ग आणि संलग्न व्यावसायिकांना भरीव आर्थिक मदत जाहीर करावी अशा आशयाचे निवेदन तेल्हारा तालुक्यातील बिछायत, मंडप डेकोरेशन, साऊंड सिस्टीम व्यवसायिकांनी तेल्हारा तहसीलदार राजेंद्र सुरडकर यांच्यामार्फत शासनास दिले आहे. निवेदनावर तेल्हारा तालुक्यातील बहुतांश बिछायत व्यावसायिकांच्या सह्या आहेत.
निवेदन देतेवेळी दीपक वैष्णव, लक्ष्मणराव रामभाऊ खारोडे, प्रफुल अनिल दबडघाव, धिरज संतोष बजाज, फारुख सौदागर, मुबारक अली इत्यादी बिछायत व्यवसायिक उपस्थित होते. सदर निवेदनाच्या प्रती माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, पालकमंत्री बच्चुभाऊ कडू, केंद्रीय मंत्री तथा खासदार संजयजी धोत्रे, आमदार प्रकाशजी भारसाकळे, मा. जिल्हाधिकारी जितेंद्रजी पापळकर, उपविभागीय अधिकारी श्री रामदासजी सिद्धभट्टी, इत्यादी सर्व वरिष्ठांना पाठविण्यात आल्या आहेत.