पुणे – देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असला तरी राज्यातील ग्रामीण भागात कोरोनाची लागण झालेली नाही, त्यामुळे ग्रामीण भागातील मजुरांना रोजगार हमी योजना किंवा नरेगा अंतर्गत काम देण्यात यावे, त्यासाठी मजुरांनी ग्रामपंचायतीकडे अर्ज करावा, काम न दिल्यास पुढे काय करायचे ते मी सांगतो, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मजुरांना केले आहे.
शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागात कोरोनाचा तितकासा फैलाव झालेला नाही, देशात कोरोनाचा प्रादुर्भाव होण्यापूर्वी खेड्यापाड्यांमध्ये मजुरांना दुरुस्तीचे काम, रस्त्याचे काम तसेच खोद काम मिळत होते. त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली नव्हती. मात्र आता हे काम बंद झाल्याने शेतकरी, गरीब मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यासाठी गरज असलेल्या सर्व मजुरांनी ग्रामपंचायतीकडे अर्ज करावा आणि त्या अर्जा मार्फत रोजगार हमी योजना किंवा नरेगा द्वारे काम देण्याची मागणी करावी, असे आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. देशात नोकरी तसेच व्यवसाय करणाऱ्यांकडून शासन मोठ्या प्रमाणावर टॅक्स वसूल करतात. याचे मुख्य कारण म्हणजे ग्रामीण भागात गरीब मजुर, शेतकऱ्यांना रोजगार हमी योजना किंवा नरेगा अंतर्गत काम मिळावे. त्यामुळे ज्या मजुरांना कामाची गरज आहे, त्यांनी सरपंच, तलाठी किंवा ग्रामपंचायतीकडे अर्ज करावा. अर्ज दिल्यानंतर तीन दिवसात काम मिळाले नाही तर आपल्याला बेरोजगार भत्ता देण्याची सोय यामध्ये आहे. त्यामुळे सर्व मजुरांनी ग्रामपंचायतीकडे अर्ज करावा. त्या अर्जाची एक प्रत आपल्याकडे ठेवावी तर दुसरी प्रत बीडीओ आणि तहसिलदाराकडे पाठविण्यात यावी, त्यांनी आपल्याला काम दिले नाही तर पुढे काय करायचे ते मी सांगतो, असेही शेवटी प्रकाश आंबेडकर म्हणाले.