शेगाव – विदर्भाची पंढरी समजल्या जाणाऱ्या श्री गजानन महाराज संस्थान शेगावचे दातृत्त्व सर्वपरिचित आहे. कोरोनाच्या संकटातही संस्थानने गोर गरीबांना मदतीचा हात पुढे केला आहे आजवर अडीच लाख भोजन पाकिट्स वाटप करून गरीबांची भूक भागवली आहे.
बुलडाण्यासह मलकापूर, मोताळा, शेगाव, पंढरपूर, त्र्यंबकेश्वर, आळंदी, ओंकारेश्वर येथील शाखांच्या माध्यमातून संस्थानने कम्युनिटी किचनच्या माध्यमातून भोजन पाकिट्सचे वितरण १७ मे पर्यंत केले. हे सर्व फिजिकल डिस्टन्सिंग ठेवून केले गेले. शेगाव येथील विसावा भक्तनिवास संकुलात ५०० बेड्सचे सुसज्ज क्वारंटाईन युनिट उभारण्यात आले आहे. डॉक्टर, नर्स आणि आरोग्य कर्मचार्यांच्या निवास, चहा, नास्त्याची सोय विसावा भक्तनिवासी संकुलात करण्यात आली आहे. आजवर एकूण अडीच लाख भोजन पाकिटांचे वाटप करण्यात आले आहे. संस्थानचे व्यवस्थापकीय विश्वस्त कर्मयोगी शिवशंकरभाऊ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच कार्यकारी विश्वस्त निळकंठदादा पाटील यांच्या देखरेखीखाली संस्थानचे सेवाकार्य अवितरपणे सुरू आहे.