मूर्तिजापूर(प्रतिनिधी)- जिल्ह्यातील मूर्तिजापूर येथील पठाणपुरा भागात राहणारा एक रुग्ण प्रथम शहरातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाला होता मात्र प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने १३ मे रोजी अकोला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्याच दिवशी त्या रुग्णाचा मृत्यू झाला होता. दरम्यान त्याचे ‘स्वॅब’ नमुने घेण्यात आले होते.मृतकाचा अहवाल १६ मे रोजी संध्याकाळी पॉझिटिव्ह प्राप्त झाल्याने शहरात खळबळ उडालेली आहे.
आतापर्यंत तालुक्यात एकही कोरोना बाधित रुग्ण नसल्याने कोरोना संबंधी हा तालुका “ग्रीन” होता. मात्र, मुर्तिजापूरच्या कोरोनामुक्तीच्या लढ्याला प्रशासनाचा हलगर्जीपणा भोवला आहे. १३ मे रोजी शहरातील एका संशयित रूग्णाचा अकोला जिल्हा सर्वोपचार रूग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. या रूग्णाचे ‘स्वॅब’ तपासणीसाठी पाठवले होते. मात्र, हा रूग्ण दगावला असताना याचा अहवाल तातडीने बोलावून तो कसा येतो याची शहानिशा करुनच रूग्णालय प्रशासनाने वैद्यकीय अहवालात नंतरच मृतदेह नातेवाईकांकडे सुपूर्द करायला हवा होता. परंतु तसे न करता रुग्णालय प्रशासनाने मृतदेह नातेवाईकांना कसा सुपूर्द केला हाच संशोधनाचा विषय ठरला आहे. मृतक हा शहरातील राजकीय क्षेत्रातील व्यक्तीमत्व असल्याने त्याच्या अंत्ययात्रेत संचारबंदी असतांनाही मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होती.या अंत्ययात्रेत अंत्यसंस्कारावेळी कोणतीही विशेष काळजी घेतल्या गेली नव्हती. त्यामुळे रुग्ण असताना व मृतदेहाच्या संपर्कात येणाऱ्यांचा आकडा हजारांच्या घरात आहे. संपर्कात आलेल्या लोकांचा शोध घेणे आता मोठी डोकेदुखी ठरली असली तरी अनेकांना कॉरंटीन करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. यात पोलीस, नगर परिषद, प्रशासनातील अधिकारी, नगरसेवक व कर्मचाºयांचा समावेश आहे. १६ मे रोजी पॉझिटिव्ह आल्याने प्रशासन खडबडून जागे झाले.मात्र या बाबीमुळे मूर्तिजापूर वासीयांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.मात्र प्रशासनाचा हलगर्जीपणा आणि अंत्ययात्रेतील जमाव यामुळे मात्र कोरोना बधितांची संख्या वाढणार याची शक्यता वर्तवली जात आहे.मात्र अहवाल येईपर्यंत मृतकाची बॉडी नातेवाईकांना का दिली असा प्रश्न जनतेला पडला आहे.