उत्तर प्रदेश मधलं पवित्र शहर असणारं प्रयागराज एका हत्याकांडाने हादरून आज हादरून गेलं. कामवाल्या बाईसोबत अवैध संबंधांना विरोध केल्याने मुलानेच आपले आई, वडिल, पत्नी आणि बहिणीची सुपारी देऊन हत्या केली. पोलिसांनी हिसका दाखवताच त्याने हत्येची कबुली दिली. या घटनेने सर्व शहर हादरून गेलं आहे. त्याने आपल्या एका मित्राला या चौघांची हत्या करण्याची सुपारी दिल्याचं उघड झालं आहे.
अतिश केशरवानी असं त्या क्रुरकर्म्या मुलाचं नाव आहे. अतिशचे त्याच्या घरी काम करणाऱ्या मोलकरणीशी संबंध होते. अतिशचं लग्नही झालेलं आहे. त्याच्या या कृत्याला त्याच्या घरच्यांचा विरोध होता. त्यांनी आणि त्याच्या बायकोनेही अतिशला अनेकदा समजावून सांगितलं होतं. मात्र तो ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. त्याचं आणि तिचं प्रेमप्रकरण सुरूच होतं.
यावरून घरात भांडणही होत होती. या भांडणांना अतिश कंटाळला होता. त्यामुळेच त्याने पत्नीसहीत सगळ्यांचाच काटा काढण्याचा निर्णय घेतला. त्याने आपल्याच एका मित्राला याची ८ लाखांना सुपारी दिली. प्रत्येक हत्येसाठी २ लाख देण्याचं ठरलं होतं. ७५ लाख रुपये त्याने अडव्हांस म्हणूनही दिले होते.
त्यातूनच मित्राने हे हत्याकांड घडवून आणलं. आणि त्यानेच पोलिसांना जाऊन सांगितलं की लॉकडाऊनमुळे दुकान बंद आहे. मी काही तासांसाठी बाहेर गेलो होतो. मात्र घरी आल्यावर या चौघांची हत्या झाल्याचं आढळून आलं. पोलिसांना त्याचा संशय आला. त्यामुळे त्यांनी त्याची खास त्यांच्या स्टाईलने चौकशी केली आणि अतिशचं बिंग फुटलं.
त्याचा त्याच्या बहिणीवरही राग होता. त्याच्या बहिणीने अतिश आणि त्या मोलकरणीचे फोटो फेसबुकवर टाकून त्यांच्या संबंधांची वाच्यता केली होती.
पोलिसांनी अतिश आणि त्याच्या मित्राला अटक केली असून त्यांना मदत करणाऱ्या इतर काही जणांनाही पोलिसांनी जेरबंद केलं आहे.