नागपूर, ता. ११ : ‘कोरोना’ विषाणूच्या दृष्टीने पुढील काही दिवस महत्त्वाचे आहेत. नागपुरात सारे काही सध्या नियंत्रणात असले तरी उद्भवणाऱ्या कुठल्याही परिस्थितीशी दोन हात करता यावे, यासाठी नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे सूक्ष्मनियोजन करून त्यादृष्टीने तयारी करीत आहे. त्याच अनुषंगाने कळमेश्वर मार्गावरील येरला येथील राधास्वामी सत्संग ब्यास या संस्थेच्या सहकार्याने त्यांच्या आश्रमाच्या परिसरात पाच हजार बेडचे नियोजन असलेले सर्व सोयींनी युक्त ‘कोव्हिड केअर सेंटर’ उभारण्यात आले आहे. अशा प्रकारचे इतक्या मोठ्या क्षमतेचे व एवढ्या कमी कालावधीत तयार होणारे हे पहिले ‘कोव्हिड केअर सेंटर’ ठरू शकते.
ही संकल्पनाच मुळात नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी मांडली. सध्या नागपुरात विविध ठिकाणी सुमारे ४२ विलगीकरण कक्ष उभारण्यात आले आहे. क्षमतेच्या दृष्टीने आणि त्यामध्ये विलगीकरण करण्यात आलेल्या नागरिकांच्या संख्येच्या तुलनेत ते आता अपुरे पडण्याची शक्यता आहे. कारण नागपुरात जे-जे व्यक्ती कोरोनाबाधीत आढळत आहेत, त्यांच्या संपर्कातील सर्वच लोकांना सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने सक्तीच्या विलगीकरणात पाठविण्याची भूमिका मनपा आयुक्तांनी स्वीकारल्याने विलगीकरण केलेल्यांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. भविष्यात कोविड रुग्ण संख्येत वाढ झाल्यास त्यांची योग्य सोय अशा ठिकाणी व्हावी, त्यांच्यावर तेथेच उपचार करता यावे, यादृष्टीने मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी ‘कोव्हिड केअर सेंटर’ची संकल्पना मांडली. त्यांच्या या संकल्पनेला राधास्वामी सत्संग ब्यासने सहकार्य करीत उपचार कालावधीसाठी जागा उपलब्ध करून दिली. केवळ जागाच उपलब्ध करून दिली नाही तर या सेंटरसाठी आवश्यक त्या सर्व सोयी उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शविली. मॅटीन, बॅरिकेटींग, कम्पार्टमेंट, साईडिंग, डोम या सर्व व्यवस्था संस्थेने उपलब्ध करून दिल्या. इतकेच नव्हे तर शुद्ध पिण्याचे पाणी आणि रुग्णांकरिता सात्विक भोजन ही सुद्धा व्यवस्था संस्थेने केली आहे. डॉक्टर तसेच आरोग्य कर्मचारी, बेड, चादर, उशी, भोजनासाठी ट्रे व अन्य काही व्यवस्था नागपूर महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आली आहे. एकूणच केंद्र शासन आणि राज्य सरकारने ‘कोविड केअर सेंटर’बाबत ठरवून दिलेल्या सर्व मार्गदर्शक तत्वांचे पालन करूनच हे ‘कोव्हिड केअर सेंटर’ उभारण्यात आले आहे. या सेंटरला भेट देऊन येथील संपूर्ण व्यवस्थेची मनपा आयुक्त श्री.तुकाराम मुंढे यांनी पाहणी केली.
‘कोव्हिड केअर सेंटर’मध्ये सद्यस्थितीत ५०० बेड तयार करण्यात आले असून गरजेनुसार ती पुढे वाढविण्यात येणार आहे. येथे महिला आणि पुरुष रुग्णांसाठी स्वतंत्र बेड आणि प्रसाधनगृहांची व्यवस्था आहे. प्रत्येक बेडला क्रमांक देण्यात आले असून तोच रुग्ण क्रमांक राहील. प्रत्येक १०० बेडच्या मागे २० डॉक्टर, वैद्यकीय चमू आणि इतर कर्मचा-यांची टिम कार्यरत असणार आहे. सोशल डिस्टंसिंगच्या नियमांची काटेकोर अंमलबजावणीसह ‘कोव्हिड केअर सेंटर’मध्ये उत्तम व्यवस्था करण्यात आली आहे.
विलगीकरण केलेल्या रुग्णांसाठी आवश्यक ती सर्व वैद्यकीय व्यवस्था येथे करण्यात आली आहे. त्यांचे तापमान तपासणी, रक्त तपासणीही येथे केली जाणार आहे. याशिवाय रुग्णांचे येथे स्वॅब घेण्यात येईल. स्वॅबच्या अहवालानंतर रुग्ण जर पॉझिटिव्ह असेल आणि प्रकृती अतिगंभीर असेल तरच त्याची रवानगी रुग्णालयातील कोव्हिड वॉर्डात करण्यात येईल. मात्र पॉझिटिव्ह असतानाही जर प्रकृती गंभीर नसेल, सहज उपचार शक्य असतील तर त्याला तेथेच अन्य कक्षात स्थलांतरित केले जाईल.
रुग्णांसोबतच या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. इंसिडंट कमांडर व अधीक्षक अभियंता श्वेता बॅनर्जी यांना या सेंटर ची जबाबदारी देण्यात आली आहे.
भविष्यात सेंटरची गरज पडू नये : आयुक्त तुकाराम मुंढे
यासंदर्भात बोलताना मनपा आयुक्त तुकाराम मुंढे म्हणाले, कोव्हिड केअर सेंटर सर्व सोयींनी युक्त आहे. आवश्यकतेनुसार येथील बेडची संख्या वाढविण्यात येत असून तब्बल पाच हजार बेडचे नियोजन आहे. त्यादृष्टीनेच ह्या कोव्हिड केअर सेंटरची आखणी आणि निर्मिती करण्यात आली आहे. या सेंटरच्या निर्मितीसाठी राधास्वामी सत्संग ब्यास संस्थेचे मोलाचे सहकार्य लाभले. या सहकार्याबद्दल मनपातर्फे संस्थेचे मन:पूर्वक आभार. मात्र ह्या सेंटरची भविष्यात गरज पडू नये, असेच आपले मत आहे. नागपुरातून पूर्णत: कोरोना हद्दपार व्हावा, यासाठी नागरिकांनी लॉकडाऊनचे सर्व नियम पाळावेत. पुढील काही दिवस घरीच राहावे. सोशल डिस्टंसिंग पाळावे. मास्कचा वापर करावा. कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी संपूर्ण सहकार्य करावे, असे आवाहन मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केले आहे.