मुंबई. विधानपरिषदेच्या 9 रिक्त जागांसाठी होत असलेल्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे स्वत: उमेदवार आहेत. मुख्यमंत्र्यांनी विधानभवनात आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
येत्या २१ मे रोजी विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक होत असून,उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी आज शिवसेनेतर्फे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,नीलम गो-हे,राष्ट्रवादीकडून शशिकांत शिंदे,अमोल मिटकरी, तर काँग्रेसकडून राजेश राठोड यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. मुख्यमंत्री ठाकरे आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा अर्ज दाखल करताना उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे,पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे,तेजस ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीचे सर्व नेते आणि मंत्री उपस्थित होते.भाजपने आपल्या चार उमेदवारांचे अर्ज यापूर्वीच भरले आहेत.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह शिवसेनेच्या डॉ.नीलम गो-हे, भाजपचे रणजितसिंह मोहिते पाटील,गोपीचंद पडळकर, डॉ. अजित गोपछेडे,प्रवीण दटके आणि काँग्रेसतर्फे राजेश राठोड यांच्या बिनविरोध निवडीची घोषणा लवकरच करण्यात येईल.
मुख्यमंत्र्यांना 6 महिन्यांच्या आत आमदार होणे आवश्यक असते
उद्धव ठाकरे विधानसभेचे सदस्य नसताना मुख्यमंत्री झाले होते. अशा परिस्थितीत मुख्यमंत्र्यांना 6 महिन्यांच्या आत आमदार होणे आवश्यक असते. उद्धव ठाकरे यांची ती मुदत 27 मे रोजी संपत आहे. आघाडीने 6 उमेदवार दिल्यास निवडणूक झाली असती. 21 मे रोजी मतमोजणी होती. नवनिर्वाचित सदस्यांना आमदारकीची शपथ घ्यावी लागते. आता निवडणूक बिनविरोध होणार असल्याने 14 मे रोजी उमेदवारांच्या निवडीची घोषणा होईल.
विधानसभा पक्षीय बलाबल :
भाजप 105, शिवसेना 56, राष्ट्रवादी 54, काँग्रेस 44, छोटे पक्ष 16, अपक्ष 1 आमदार आहेत. – एका उमेदवारास विजयी होण्यासाठी पहिल्या पसंतीची 29 मते (कोटा) आवश्यक आहेत.