पातुर – पतीने आपल्या पत्नीचा बत्त्याने ठेचून खून करण्याची घटना सोमवारी पहाटेच्या सुमारास पातूर तालुक्यातील आलेगाव येथील गौरक्षण व प्रभा प्रकाश कॉन्व्हेंटच्या आवारातील खोलीत घडली.
चारित्र्याच्या संशयावरून ही घटना घडल्याचे सांगण्यात येत असले तरी नेमके कारण पोलीस तपासानंतर समोर येईल. या घटनेची माहिती पसरताच परिसरात एकच खळबळ उडाली.
मेहकर तालुक्यातील जनुना येथील एक कुटुंब आलेगाव येथील गोरक्षण मध्ये वास्तव्यास होते. मनोहर भिका मेटांगे व जिजा मनोहर मेटांगे असे या जोडप्याचे नाव आहे. मनोहर भिका मेटांगे याचे त्याची पत्नी जीजा मनोहर मेटांगे वय 35 हिच्यासोबत वाद होता. चर्चेतून प्राप्त माहितीनुसार पत्नीवर असलेल्या संशयातून त्याने रविवार व सोमवारच्या रात्री साडेतीन वाजताच्या सुमारास जिजा हिला खलबत्त्याने ठेचून मारले.
यावेळी आठ वर्षाची मुलगी घरात होती, तिने आरडाओरड केली. त्यामुळे आजूबाजूचे लोक धावून आले. जिजाचा खून केल्यानंतर मनोहर ने स्वतः आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मुलीचा अत्यंत भेदरलेला आवाज व आरडाओरड ऐकून काहीतरी अघटीत घडले याचा अंदाज आल्याने शेजारी नागरिकांनी घराचा दरवाजा तोडला. आठ वर्षाच्या मुलीसह दोनवर्षाच्या मुलाला नागरिकांनी बाहेर काढले व पोलिसांना माहिती दिली.
घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी डॉक्टर रोहिणी साळुंके. ठाणेदार गणेश वनारे, पोलीस उपनिरीक्षक रामराव राठोड, गजानन पोटे, देवेंद्र चव्हाण, बालाजी सानप, अमोल कांबळे, सुनील भाकरे, घटनास्थळी पोहोचले. ठसे तज्ञांना घटनास्थळी बोलावण्यात आले, त्यांनीही तपासणी केली. हत्येचे नेमके कारण जाणून घेण्यासाठी पोलीस पुढील तपास करीत आहेत.