अकोला,दि.४- अकोला ते लखनौ गाडी क्रमांक ०१९०३ स्पेशल श्रमिक एक्सप्रेस सायंकाळी सहा वाजता अकोला रेल्वेस्थानकावरुन रवाना झाली. लॉक डाऊन मुळे इथं अडकून राहिलेल्या या उत्तर प्रदेशातील श्रमिक, मजूर, नागरिकांना आज आपल्या गावी जाण्याची अपेक्षा पूर्ण झाली. ते उद्या दुपार पर्यंत लखनौला पोहोचतील.
कोरोना संसर्गाचा प्रतिबंध करण्यासाठी लागू करण्यात आलेला लॉक डाऊन कालावधीत अडकून पडलेल्या परप्रांतीय मजूरांना आज विशेष श्रमिक रेल्वेगाडीने उत्तर प्रदेश लखनौ येथे रवाना करण्यात आले. या ट्रेनमध्ये ११९२ प्रवासी होते. यावेळी विभागीय आयुक्त पियुष सिंह यांची उपस्थिती होती. जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, पोलीस अधिक्षक अमोघ गावकर, भुसावळ रेल्वे मंडळाचे सहाय्यक वाणिज्य प्रबंधक अनिल बागले, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, उपजिल्हाधिकारी बाबासाहेब गाढवे, प्रांताधिकारी डॉ. निलेश अपार, तहसिलदार विजय लोखंडे आदी उपस्थित होते.
पश्चिम विदर्भात अडकलेल्या या प्रवाशांच्या जाण्यासाठी विशेष रेल्वेची व्यवस्था व्हावी यासाठी केंद्रीय राज्यमंत्री ना. संजय धोत्रे यांचे विशेष मार्गदर्शन व प्रयत्न लाभले होते. एकूण २४ कोच असलेल्या या विशेष रेल्वे गाडीत उत्तर प्रदेशात जाणारे अकोला जिल्ह्यातील २२२, अमरावती जिल्ह्यातून ५६६, यवतमाळ जिल्ह्यातून २४६, वाशीम जिल्ह्यातून १४८ असे ११९२ उत्तर प्रदेशात जाणारे मजूर आज रवाना झाले. यासाठी या सर्व जिल्ह्यातून विशेष बस गाड्यांद्वारे या प्रवाशांना अकोला रेल्वे स्टेशनवर आणण्यात आले. आल्यावर प्रत्येक प्रवाशाची थर्मल स्कॅनिंग करुन वैद्यकीय तपासणी करण्यात आली. जातांना प्रत्येकाला फुड पॅकेट, पाण्याची बाटली देण्यात आली. सायंकाळी सहा वाजता अकोला रेल्वेस्टेशन वरुन ही गाडी रवाना झाली. जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी या गाडीला हिरवा झेंडा दाखवून रवाना केले.
या संदर्भात पश्चिम विदर्भातील १२३० उत्तर प्रदेश मधील कामगार व नागरिकांची नोंदणी झाली होती. प्रत्यक्षात ११९२ कामगार व नागरिक आज रवाना झाले. ही गाडी कुठेही न थांबता सरळ लखनऊ येथे पोहोचणार आहे. या सर्व प्रवाशांची संध्याकाळच्या जेवणाची व पाण्याची व्यवस्था शासनाच्या वतीने करण्यात आली. लहान बालकांना ग्लुकोज बिस्कीट देण्यात आले. रेल्वे प्रशासनाच्या सहकार्याने आज विशेष ट्रेन रवाना करण्यात आली.