अकोला- कोरोना बाधितांची संख़्या आता अकोला मनपा हद्दीत विशेषतः बैदपुरा व अन्य भागात वाढू लागली आहे. या पार्श्वभुमिवर जिल्हा प्रशासन अधिक सतर्क झाले असून बैदपुरा भागात जिथे सर्वाधिक रुग्ण आढळले तेथे तापुरते दोन क्वारंटाईन कक्ष व तेथेच संशयित रुग्णांच्या घशाच्या स्त्रावातील नमुने चाचणीसाठी घेण्याची सुविधा तयार करण्याचा निर्णय प्रशासनाने आज झालेल्या बैठकीत घेतला.
आज सकाळी प्रशासनातील सर्व वरिष्ठ अधिकारी व विभागप्रमुख उपस्थित होते. त्यात जिल्हा पोलीस अधिक्षक अमोघ गावकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार, मनपा आयुक्त संजय कापडणीस, अपर जिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. कुसुमाकर घोरपडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आसोले, वैद्यकीय अधिक्षक डॉ. श्यामसुंदर शिरसाम, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, उपविभागीय अधिकारी डॉ. निलेश अपार आदी उपस्थित होते.
यावेळी शहरातील वाढत्या रुग्ण संख्येबाबत चिंता व्यक्त करण्यात आली. त्यादृष्टिने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील व्यवस्थांचे सुसूत्रीकरण करणे, संदिग्ध रुग्णांचे घशातील स्त्राव घेण्यासाठी बाधीत परिसरातच सुविधा तयार करणे आदी विषयांवर चर्चा करुन निर्णय घेण्यात आले. त्यानुसार बैदपुरा भागात जि.प. उर्दू शाळा व आबासाहेब खेडकर सभागृह येथे तात्पुरते क्वारंटाईन कक्ष तयार करणे व तेथेच घशातील स्त्रावांचे संकलन करण्यासाठी सुविधा तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला. मनपा हद्दीत सध्या ११ प्रतिबंधित क्षेत्र असून येथील घरोघरी जाऊन तपासणी सुरु आहे. पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील अधिकाधिक व्यक्तिंची तपासणी करावी, असे ठरविण्यात आले. तसेच ग्रामिण भागातील वैद्यकीय कर्मचाऱ्यांची जादा कुमक मनपा हद्दीत तैनात करण्यात येणार आहे.
ना. धोत्रे यांनीही घेतला आढावा
दरम्यान केंद्रीय मानव संसाधन विकास माहिती तंत्रज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स दूरसंचार राज्यमंत्री ना. संजय धोत्रे यांनीही जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी वाढत्या रुग्ण संख्येबाबत चिंता व्यक्त करत ना. धोत्रे यांनी करावयाच्या उपाययोजनांचा जिल्हाधिकारी पापळकर यांच्याकडून आढावा घेतला. तसेच अकोला जिल्ह्यातून बाहेर गावी जाऊ इच्छिणाऱ्या व बाहेर अडकलेल्या व अकोला येथे परत येऊ इच्छिणाऱ्या प्रवाशांच्या ने आण करण्याच्या व्यवस्थेचीही माहिती घेतली व आवश्यक सुचना केल्या.
अधिक वाचा: महाराष्ट्रातील मजुरांचा प्रवास खर्च महाराष्ट्र काँग्रेस करणार