नवी दिल्ली : येत्या 31 मे रोजी होणारी युपीएससीची पूर्वपरीक्षा केंद्रीय लोकसेवा आयोगाने रद्द केली. कोरोना संक्रमणामुळे ही परीक्षा रद्द करण्यात आली असून एकंदर परिस्थिती पाहून 20 मे नंतर परिक्षेची नवी तारीख जाहीर केली जाईल, असे आयोगाकडून सांगण्यात आले आहे. याआधी वैद्यकीय प्रवेशासाठीच्या ‘नीट’ सह इतर परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या होत्या.
कोरोना संक्रमणाच्या स्थितीचा आढावा घेऊन 20 मे नंतर युपीएससीच्या पूर्वपरिक्षेची नवी तारीख निश्चित केली जाणार आहे. देशाच्या अनेक भागात कोरोना विषाणूचे संक्रमण अतिशय वेगाने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर पूर्वपरीक्षा घ्यायची की नाही, यावर विचारविमर्श करण्यासाठी केंद्रीय लोकसेवा आयोगाने आपल्या उच्च अधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. परीक्षा पुढे ढकलण्याचा सूर बैठकीत उमटल्यानंतर अखेर आयोगाने ही परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला.
केंद्र सरकारने अलीकडेच लॉकडाऊनचा कालावधी वाढवत 17 मे पर्यंत लॉकडाऊन राहील, असे स्पष्ट केले आहे. लॉकडाऊनची स्थिती पाहता तसेच रेड आणि ऑरेंज विभागात असलेले विविध प्रकारचे निर्बंध लक्षात घेता अशा ठिकाणी परीक्षा घेणे शक्य नसल्याचे आयोगाच्या सूत्रांनी सांगितले. लॉकडाऊनच्या काळात असंख्य शाळांचे रूपांतरण क्वारंटाईन केंद्रामध्ये करण्यात आलेले आहे. त्यामुळे परीक्षा केंद्रे असलेल्या अशा शाळांमध्ये 30 तारखेला परिक्षेचे आयोजन करणे शक्य नाही. पूर्वपरिक्षेच्या पार्श्वभूमीवर पुढील आठवड्यात विद्यार्थ्यांना अॅडमिट कार्ड जारी केले जाणार होते