मुंबई : काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी राज्यांतील प्रदेश काँग्रेसला आपापल्या राज्यातील मजुरांच्या तिकिटाचा खर्च करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यावर आता महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने मजुरांचा प्रवास खर्च उचलण्याचा निर्णय घेतला आहे. याची माहिती महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी ट्विटरवरुन दिली आहे.
लॉकडाऊनमुळे संकटात सापडलेल्या गरीब, कष्टकरी, मजूरांना मोदी सरकारने वा-यावर सोडले आहे. @INCIndia अध्यक्षा सोनियाजी गांधी यांनी केलेल्या घोषणेनुसार महाराष्ट्रात अडकून पडलेल्या मजूरांचा घरी जाण्याचा रेल्वे प्रवासाचा खर्च @INCMaharashtra करणार आहे.#CongressForIndia pic.twitter.com/0eefNwSYs6
— Balasaheb Thorat (@bb_thorat) May 4, 2020
लॉकडाऊनमुळे अडकून पडलेल्या मजुरांच्या प्रवासाचा खर्च काँग्रेस पक्ष उचलणार असल्याची घोषणा काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केली आहे. महाराष्ट्रातील मजुरांचा प्रवासखर्च महाराष्ट्र काँग्रेस करणार आहे. काँग्रेस मत्र्यांच्या बैठकीत मजुरांच्या प्रवासासंदर्भातील नियोजनाबाबत चर्चा झाल्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
देशात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी अनेक राज्यातील स्थलांतरित कामगार लॉकडाऊनमध्ये अडकले होते. काँग्रेससह अनेक विरोधी पक्षांनी सरकारला या मुद्यावरून चांगलेच धारेवर धरले होते. तथापि, नंतर केंद्र सरकारने सर्व संबंधित राज्यांना आपल्या कामगारांना अटींवर परत आणण्याची परवानगी दिली. आता अडकलेल्या परप्रांतीय मजुरांना काँग्रेसने मदत करण्याची घोषणा केली आहे.