अकोला,दि.३– कोरोना व्हायरस प्रतिबंधक उपाययोजनांचा भाग म्हणून संदिग्ध रुग्णांना १४ दिवस निरीक्षणात ठेवण्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाचे वसतिगृह हेल्थ केअर सेंटर तयार करण्यासाठी अधिग्रहित करण्याचे आदेश आज जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी निर्गमित केले. या आदेशानुसार विद्यापीठाच्या पाच वसतीगृहातील ११७ खोल्या अधिग्रहित करण्यात आल्या आहेत.
या आदेशान्वये डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठातील रायगड (४० खोल्या), सातपुडा (२५), नरनाळा (२५), सह्याद्री (१५) फॉरेस्ट्री होस्टेल (१२) अशा एकूण ११७ खोल्या अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. या खोल्या मध्ये हेल्थ केअर सेंटर तयार करण्यासाठी जिल्हा शल्य चिकित्सकांच्या ताब्यात देण्यात आली आहे. हा परिसर कलम १४४अन्वये प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे. या ठिकाणी शासकीय कर्तव्यासाठी व वैद्यकीय सेवेसाठी जाणाऱ्या व्यक्तिंच्या नोंदी ठेवाव्यात. डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाचे कुलसचिव यांनी या ठिकाणी विद्युत, पाणी व अन्य आवश्यक सुविधा अखंडीतपणे उपलब्ध करुन द्याव्या तसेच प्रत्येक वसतीगृहासाठी स्वतंत्र नोडल अधिकारी नेमावा. या ठिकाणि निरीक्षणाखाली ठेवण्यात येणाऱ्या व्यक्तिंची माहिती गोपनीय ठेवण्याची दक्षता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घ्यावी, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.