मुंबई : केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनेनुसार परराज्यात अडकलेल्या कामगार,विद्यार्थी आणि पर्यटकांना आपल्या राज्यात परवानगी देण्यात आली आहे.तर राज्य सरकारने राज्यातील विविध जिल्ह्यात अडकलेल्या नागरिकांना आपल्या मुळ जिल्ह्यात सशर्त परवानगी दिली असली तरी रेडझोन असलेल्या मुंबई पुण्यातील नागरिकांना दुस-या जिल्ह्यात जाता येणार नसल्याचा खुलासा प्रशासवाकडून करण्यात आला आहे.
मुंबई, पुण्यासारख्या मोठ्या शहरातून दुसरीकडे जाऊ इच्छिणाऱ्या वा अशा शहरात येऊ पाहणाऱ्या नागरिकांसाठी महत्त्वाचा खुलासा करण्यात आला आहे. पोलीस आयुक्तालय असलेल्या शहरामध्ये आंतरराज्य किंवा आंतरजिल्हा प्रवासाची परवानगी देण्याचे अधिकार संबंधित विभागाच्या पोलिस उपायुक्तांना आहेत.असे असले तरीही मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण व पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण क्षेत्रामधील नागरिकांना महाराष्ट्रातील अन्य जिल्ह्यात जाण्यास अथवा त्या जिल्ह्यातून मुंबई, पुणे क्षेत्रात येण्यास परवानगी नाही.मात्र, या दोन्ही प्राधिकरण क्षेत्रातून महाराष्ट्राबाहेर विशेषत: मजुरांना जाण्याची परवानगी आहे.
अशा परवानगीसाठी जवळच्या पोलीस ठाण्यात संपूर्ण माहितीसह मेडिकल प्रमाणपत्रासह अर्ज करता येईल. सर्व पोलिस ठाण्याची माहिती एकत्र करून त्या विभागांच्या पोलीस उपआयुक्तांकडे पाठविली जाईल. अर्जाची छाननी करून नियमानुसार आणि तेथील कोविड १९ प्रादुर्भाव परिस्थितीचा विचार करून पुढील कार्यवाही केली जाणार आहे. कृपया अर्धवट किंवा अनाधिकृत किंवा सांगोवांगी दिल्या जाणाऱ्या माहितीवर विसंबून कोणीही धावाधाव करू नये असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.