कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने देशव्यापी लॉकडाऊन आणखी दोन आठवड्यासाठी म्हणजे 17 मे पर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. 3 मे रोजी देशव्यापी लॉकडाऊनची मुदत संपणार होती, तत्पुर्वीच सरकारने लॉकडाऊन वाढविण्याचा निर्णय जाहीर केला आहे.
कोरोना संक्रमण वेगाने वाढत असल्याचे लक्षात आल्यानंतर केंद्र सरकारने मार्च महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात सर्वप्रथम 14 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन लागू केला होता. याला मुदतवाढ देत लॉकडाऊनचा कालावधी 3 मे असा करण्यात आला होता. कोरोना संक्रमण आणि लॉकडाऊनबाबतची रणनिती यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी केंद्रीय मंत्रिमंडळातील आपल्या सहकाऱ्याशी चर्चा केली. यानंतर गृह मंत्रालयाने लॉकडाऊन दोन आठवड्यासाठी वाढविला जात असल्याचे स्पष्ट केले.
लॉकडाऊनच्या अनुषंगाने गृह मंत्रालयाने नवी मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत. धोक्याची पातळी ठरवून देण्यासाठी सरकारने रेड, ऑरेंज व ग्रीन असे तीन विभाग केले आहेत. यातील ग्रीन व ऑरेंज विभागासाठी अनेक नव्या सवलती सरकारकडून देण्यात आल्या आहेत. ऑरेंज विभागात परवाना दिलेल्या कामासाठी व्यक्ती तसेच वाहनांना ये-जा करता येईल. चारचाकी वाहनात ड्रायव्हर व दोन व्यक्तींना प्रवास करता येईल तर दुचाकीस्वाराला केवळ एकट्याला प्रवास करता येईल. टॅक्सी आणि कॅब चालकांना केवळ एका प्रवाशाची वाहतूक करण्याची मुभा देण्यात आली आहे.
काय बंद राहणार?
रेल्वे सेवा, हवाई वाहतूक, मेट्रो आणि सार्वजनिक वाहतूक 17 मेपर्यंत बंद राहणार
सर्व शैक्षणिक संस्था, शाळा, कॉलेजेस 17 मेपर्यंत बंद राहणार
मॉल, सिनेमा हॉल, स्पोर्ट्स क्लब बंद 17 मेर्यंत बंद राहणार
ग्रीन झोनमध्ये काय राहणार खुलं?
ग्रीन झोनमध्ये 50 टक्के क्षमतेनेच प्रवासी वाहतूक सुरू राहणार
दारूची दुकानं आणि पान शॉप्स सुरू ठेवण्याबाबत सरकार विचार करत आहे. सोशल डिस्टन्सिंगचं पालन करत यासाठी परवानगी दिली जाण्याची शक्यता आहे.
संध्याकाळी 7 ते रात्री 7 पर्यंत वाहतूक बंद राहणार
बस डेपोमध्ये 50 टक्केच कर्मचारी काम करणार
लॉकडाऊन वाढविण्याचा निर्णय आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 नुसार घेण्यात आला असल्याची माहिती गृह मंत्रालयाकडून देण्यात आली. रेड झोनमध्ये अत्यावश्यक वस्तूंचा पुरवठा व वैद्यकीय सेवेला परवानगी देण्यात आलेली आहे. सर्व विभागात 65 वर्षांवरील वृद्ध, गरोदर महिला आणि दहा वर्षाखालील बालकांनी घरातच राहावे, असा सल्ला देण्यात आला आहे. मोदी सरकारने यावेळी लॉकडाऊनमधून ग्रीन व ऑरेंज झोनमध्ये काही सवलती दिल्या आहेत. याअंतर्गत ई कॉमर्स सेवा सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. गैरजरूरी सामानांच्या ऑनलाइन डिलिव्हरीसाठी सूट देण्यात आली आहे. ग्रीन विभागात 50 टक्के प्रवासी घेऊन बसेस चालविण्यास परवानगी देण्यात आली असून या विभागातील बस डेपोमध्ये केवळ 50 टक्के कर्मचारी काम करतील.
ग्रीन झोनमध्ये सर्व मोठ्या आर्थिक घडामोडींना परवानगी देण्यात आली आहे. कारखाने व कार्यालये काही अटींसह सुरु करण्यास परवानगी देण्यात आली असून अशा ठिकाणी सोशल डिस्टन्स पाळावे लागेल. कार्यस्थळावर वरचेवर सॅनिटायझरचा वापर करावा लागेल. ग्रामीण भागात सर्व औद्योगिक आणि निर्माण कामे, मनरेगाची कामे, खाद्य प्रक्रिया उद्योग, वीट भट्ट्या सुरु ठेवता येतील, असेही सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या सकाळी 10 वाजता देशवासियांशी पुन्हा एकदा संवाद साधणार आहेत. सकाळी 10 वाजते पंतप्रधान बोलणार आहेत. ते काय बोलतील, कुठल्या घोषणा करतील याकडे सगळ्याचं लक्ष लागलं आहे.