नवी दिल्ली : देशातील लॉकडाऊन ४ मे पासून पुढील दोन आठवड्यांनी वाढविण्यात आला आहे. याबाबतचा आदेश केंद्रीय गृहमंत्रालयाने जारी केला आहे. लॉकडाऊनचा कालावधी वाढविण्याची ही तिसरी वेळ आहे.
याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या घोषणेप्रमाणे ३ मे पर्यंत लॉकडाऊनची मुदत आहे. आता पुन्हा लॉकडाऊनची मुदत दोन आठवड्यांनी वाढविण्यात आला आहे. देशव्यापी लॉकडाऊन १७ मे पर्यंत कायम राहणार आहे. याचबरोबर गृह मंत्रालयाने लॉकडाऊन दरम्यान रेड, ग्रीन आणि ऑरेज झोनमध्ये कोणत्या उपाययोजना हाती घ्याव्यात, याबाबत नवीन मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत.
देशातील जवळपास १३० जिल्हे हे रेड झोन, २८४ जिल्हे ऑरेंज, तर ३१९ जिल्हे ग्रीन झोन घोषित करण्यात आले आहे. या यादीत महाराष्ट्रातील १४ जिल्ह्यांना संसर्गाच्या हॉटस्पॉट जिल्ह्यांच्या श्रेणीत समाविष्ठ करण्यात आले आहे.
कोरोनाचे संक्रमण आटोक्यात आणण्यासाठी सरकारने रेड, ऑरेंज आणि ग्रीन असे तीन विभाग तयार केले आहेत. कोणत्या विभागात कोणती सूट द्यायची, याची माहिती मार्गदर्शक तत्वांमध्ये नमूद केली आहे. देशातील कोरोना रुग्णांची संख्या ३५ हजाराच्या पुढे गेली आहे, अशा स्थितीत हे संक्रमण रोखण्याचे मोठे आव्हान केंद्र सरकारसमोर आहे.
दरम्यान, कोरोनाचे संकट आणि लॉकडाऊनच्या अनुषंगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज, शुक्रवारी आपल्या मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांसमवेत चर्चा केली. देशव्यापी लॉकडाऊन रविवारी संपणार असल्याच्या पार्श्वभूमीवर आगामी काळात कशा पध्दतीने कोरोनाचा मुकाबला करायचा, यावर या बैठकीत चर्चा झाल्याचे समजते.
देशभरातील मोठी अर्थात मेट्रो शहरे रेड झोनमध्येच आहेत. ज्या जिल्ह्यात गेल्या २१ दिवसांत एकही रुग्ण आलेला नाही, असे जिल्हे ग्रीन झोनमध्ये टाकण्यात आले आहेत. देशातील कोरोना रुग्णांची संख्या ३५,३६५ वर पोहोचली आहे. तर आतापर्यंत १,१५२ जणांचा मृत्यू झाला आहे. सर्वांधिक रुग्ण महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्रात आतापर्यंत १०,४९८ कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर ४५९ जणांचा मृत्यू झाला आहे.