मुंबई : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर देशात लागू करण्यात आलेल्या लॉकडऊनमुळे देशभरातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये अडकलेले स्थलांतरित कामगार, विद्यार्थी आणि पर्यटकांना आता आपापल्या घरी जाता येणार आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने आज हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असल्याने अनेक विविध राज्यात अडकलेल्या परप्रांतीय कामगारांना मोठा दिलासा मिळाला आहे.
येत्या ३ मे रोजी देशात लागू करण्यात आलेल्या लॉकडऊनची मुदत संपत आहे. सध्याची कोरोनाची परिस्थिती पाहता लॉकडऊन पुन्हा वाढविण्याची शक्यता असतानाच त्यापूर्वी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.देशात लागू करण्यात आलेल्या लॉकडऊनमुळे देशभरातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये स्थलांतरीत कामगार,विद्यार्थी आणि पर्यटक मोठ्या प्रमाणात अडकले आहेत. केंद्रीय गृहमंत्रालयाने अशा अडकलेल्या सर्वांना प्रवासाला परवानगी दिली आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने यासंबंधीचा आदेश आज जारी केला आहे. कामगार, विद्यार्थी आणि पर्यटकांची ने-आण करण्याची व्यवस्था संबंधित राज्य सरकारला करावी लागणार आहे. अडकलेल्या अशा व्यक्तींना त्यांच्या राज्यात पाठवताना कोणताही गोंधळ होऊ नये यासाठी नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. या सर्वांना प्रवासाची परवानगी देण्यापूर्वी त्यांची तपासणी केली जाणार असून कोरोनाची लक्षणे नसलेल्यांनाच परवानगी देण्यात येणार येईल असेही या आदेशात म्हटले आहे.
महिन्यापूर्वी देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला.त्यावेळी अनेक राज्यात मोठ्या प्रमाणात कामगार, पर्यंटक आणि विद्यार्थी अडकले आहेत. सध्या संबंधित राज्य सरकार त्यांची जबाबदारी उचलत असले तरी महिनाभर दुस-या राज्यात अडकलेल्या लोकांना आपल्या घरी परतायचे आहे. मुंबईत मोठ्या प्रमाणात परराज्यातील कामगार अडकून पडले आहेत. त्यांनी काही दिवसांपूर्वी आपल्याला गावी जावून द्यावे यासाठी बांद्रा स्थानका बाहेर ठिय्या मांडला होता. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अशा कामगारांचा उद्रेक होण्यापूर्वी त्यांना आपापल्या घरी जाण्यासाठी विशेष ट्रेन सोडण्याची मागणी केंद्राकडे केली होती. आता केंद्रीय गृहमंत्रालयाने घेतलेल्या या निर्णयामुळे विविध राज्यात अडकलेल्या अनेक कामगार, विद्यार्थ्यी आणि पर्यंटकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
अधिक वाचा: अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या वतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी ८२ हजार रुपये