अकोला, दि.२९- सीसीआय कडील कापूस खरेदी साठी शेतकऱ्यांनी करावयाची नोंदणी करण्यासाठी येत्या १० मे पर्यंत मुदतवाढ देण्यात आली असून शेतकऱ्यांनी लवकरात लवकर कापूस नोंदणी करुन विक्री करावा, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था डॉ. प्रविण लोखंडे यांनी केले आहे.
यासंदर्भात जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था अकोला यांच्या कार्यालयाने जिल्ह्यातील सर्व कृषि उत्पन्न बाजार समितीच्या सभापती व सचिवांना कळविले आहे की, लॉक डाऊनच्या काळात सुरु करण्यात आलेली कापूस खरेदी बंद करण्यात आली होती. जिल्ह्यातील बाजार समितींच्या मागणीनुसार जिल्ह्यात सीसीआय या संस्थेमार्फत कापूस खरेदी करण्यासाठी कापूस खरेदी केंद्रांना परवानगी देण्यात आली आहे. यासंदर्भात महाप्रबंधक केंद्रीय कापूस निगम अकोला यांच्याशी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था अकोला यांनी चर्चा करुन सीसीआय कापूस खरेदी नोंदणी ही गुरुवार दि.३० नंतरही सुरु ठेवण्यास सहमती दर्शविली आहे.
त्यानुसार येत्या रविवार दि.१० मे पर्यंत कापूस खरेदीसाठी नोंदणी करता येणार आहे. त्यानुसार शेतकऱ्यांनी आगामी पावसाळ्याचा कालावधी लक्षात घेता आपल्याकडील कापसाची लवकरात लवकर नोंदणी करुन विक्री करावा, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक डॉ प्रविण लोखंडे यांनी केले आहे. यासंदर्भात सर्व कृषि उत्पन्न बाजार समित्यांनी कार्यवाही करावी, असे निर्देशही दिले आहेत.
अधिक वाचा: हिवरखेड परीसरात अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे केळी पिकाचे मोठ्या प्रमाणात नूकसान …