पातूर (सुनिल गाडगे) : जगभरात थैमान घातलेल्या कोरोना मुळे सुरू असलेल्या लॉकडाऊन मध्ये अनेक सरकारी-निमसरकारी, खाजगी संस्था, समाजसेवक अत्यावश्यक सेवा पुरवणारे आपली सेवा देत आहेत. यात वन्यजीव रक्षक तथा सर्पमित्र देखील मागे नाहीत.मागील काही वर्षांपासून पातूर शहर तसेच तालुका परिसरात निरंतर सेवा देत असलेल्या सर्पमित्रांनी लोकडाऊन च्या काळात देखील वन्यजीव रक्षणाचा वसा जोपासला आहे. एकीकडे कोरोना विषाणूचा फैलाव हा चीनमध्ये वन्यप्राण्यांमुळे झाला असा समज असता पातूर येथील सर्पमित्र मात्र आपल्या जीवाची पर्वा न करता आपली सेवा देत आहेत. दि.28 एप्रिल रोजी स्थानिक नागरिकांकडून बंजारा कॉलनी येथे मोठा साप असल्याची माहिती मिळताच सर्पमित्रांची चमू त्या ठिकाणी पोहचली व आजूबाजूला शोध घेतला असता 8 ते 10 फूट लांब धामण जातीचा साप असल्याचे आढळले. एवढा लांब साप पाहून भयभीत असलेल्या नागरिकांना सर्पमित्रांनी सदर साप हा बिनविषारी असून निरुपद्रवी असल्याचे सांगितले व सापाला पकडून भयमुक्त केले. यावेळी सर्पमित्र संजय बंड, अमोल सोनोने, प्रमोद कढोणे, स्वप्निल सुरवाडे उपस्थित होते.