मुंबई : प्रतिभाशाली अभिनेता इरफान खानचे निधन झाले. वयाच्या ५४ व्या वर्षी त्याने अखेरचा श्वास घेतला. २०१८ मध्ये इरफान खानला न्यूरोइंडोक्राइन ट्यूमर असल्याचे निदान झाले होते. त्याच्यावर लंडनमध्ये उपचार सुरू होते. त्यानंतर तब्येत सुधारल्याने तो भारतात परतला होता. त्याच्या आईचेही नुकतेच निधन झाले होते. लॉकडाऊनमुळे तो तिच्या अंत्यसंस्कारात सहभागी होऊ शकला नव्हता.
इरफानने जवळपास ३० वर्षांच्या करिअरमध्ये ५० हून अधिक बॉलिवूड चित्रपटांमध्ये त्याने काम केले. बॉलिवूडसोबतच त्याने हॉलिवूडमध्येही त्याने आपल्या अभिनयाची छाप सोडली. त्याच्या कलाक्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीसाठी २०११ मध्ये ‘पद्मश्री’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
लंडनमधून उपचारासाठी परत आल्यानंतर इरफान कोकिलाबेन रुग्णालयात डॉक्टरांच्या देखरेखीखाली होता. गेल्या अनेक महिन्यांपासून ते कोकिलाबेन रुग्णालयात आपल्या आजाराशी संबंधित नियमित तपासणी व उपचार करून घेत होता. ‘इंग्लिश मीडियम’ चित्रपटाच्या वेळीही त्याची तब्येत खालावत चालली होती. अशा परिस्थितीत संपूर्ण युनिटला शूटिंग थांबवावे लागले होते. जेव्हा इरफानला बरे वाटेल तेव्हा पुन्हा शॉट घेण्यात येत असे.