मुंबई : कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे देशभरात लॉकडाऊन लावण्यात आला. परंतु देशव्यापी लॉकडाऊनमुळे राज्यातील काही परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र येत्या दोन आठवड्यांमध्ये म्हणजेच 10 मे पर्यंत राज्यातील परीक्षांचे चित्र स्पष्ट होईल, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली. सुप्रिया सुळे यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून राज्यातील जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध विषयांवर आपलं मत मांडलं.
“लॉकडाऊनमुळे विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी बोनस वेळ मिळाला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपला अभ्यास सुरुच ठेवावा. येत्या 10 मेपर्यंत परीक्षांबाबत संपूर्ण चित्र स्पष्ट होईल. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्याशी या विषयावर चर्चा झाली. ते यावर काम करत आहेत आणि लवकरच चित्र स्पष्ट होईल,” असं खासदार सुळे यांनी सांगितलं.