अकोला,दि.२८: कोरोना विषाणूच्या पार्श्वभुमिवर लागू असलेल्या संचारबंदी काळात जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणारी दुकाने सुरु ठेवण्यास सुट देण्यात आली आहे. तथापि या दुकानांमध्ये वस्तूंचे आदानप्रदान होतांना दोन व्यक्तींमधील परस्पर अंतराचे पालन होत नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यासाठी कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी परस्पर अंतर राखण्याबाबतच्या नियमांचे पालन होणे आवश्यक आहे. त्यासाठी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आदेश जारी करुन नियमावली जारी केली आहे. त्यानुसार, दुकानदार व ग्राहकांनी परस्परांमधील अंतर पाळणे अनिवार्य आहे. हे अंतर न पाळणारे दुकानदार, ग्राहक, मालक यांना किमान एक हजार रुपये दंड आकारण्यात येईल. दोन वेळ दंडनिय कारवाई करुनही सुधारणा न झाल्यास संबंधित दुकानाचा परवाना रद्द करण्यात येईल. दुकानात मालाची हाताळणी करणारे व्यक्ती, मालक, नोकर आदींनी मास्क व हॅण्ड ग्लोव्हज वापरणे आवश्यक आहे. दुकानदारांनी दुकानात सॅनिटायझर व अन्य साहित्य ग्राहकांना हात धुण्यासाठी ठेवणे आवश्यक आहे. एका वेळी पाच व्यक्तीच दुकानासमोर राहतील व त्या व्यक्तींनीही परस्परांमधले अंतर राखणे आवश्यक आहे. ग्राहक व काऊंटर मध्ये किमान तीन फुटाचे अंतर राखावे, या आदेशाचा भंग होत असल्याचे निदर्शनास आल्यास संबंधितांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यासाठी संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना प्राधिकृत करण्यात येत आहे, असेही आदेशात नमूद केले आहे.