अकोला- आज दिवसभरात कोरोना संसर्ग तपासणीचे सहा अहवाल प्राप्त झाले. ते सर्व निगेटीव्ह आले आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सूत्रांनी दिली आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजअखेर एकूण ५९९ नमुने पाठविण्यात आले आहेत. त्यापैकी ५४२ अहवाल आले आहेत. आजअखेर एकूण ५२५
अहवाल निगेटीव्ह प्राप्त झाले आहेत व ५७ अहवाल प्रलंबित आहेत.
आजपर्यंत एकूण ५९९ जणांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे ४७३, फेरतपासणीचे ८५ तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे ४१ नमुने होते. आजपर्यंत एकूण ५४२ अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे ४२१ तर फेरतपासणीचे ८३ व वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे ३८ अहवाल आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या ५२५ आहे. आज प्राप्त झालेल्या सहा अहवालात सर्व अहवाल निगेटीव्ह आले आहेत.
जिल्ह्यात आता एकूण कोवीडबाधीत रुग्णसंख्या १७ झाली आहे. त्यातील दोघे मयत झाले. गुरुवारी (दि.२३) सात जणांना व आज एका जणास असे आठ जण बरे होऊन घरी सोडण्यात आले. त्यामुळे आजअखेर सात रुग्ण उपचार घेत आहेत,अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील सूत्रांनी दिली आहे. उपचार घेत असलेल्या सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याचेही शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.
कालच्या रुग्णाच्या संपर्कातील ४६ जण रुग्णालयात
काल (रविवार दि.२६) पॉझिटीव्ह आढळलेल्या सिंधी कॅम्प भागातील रहिवासी असलेल्या रुग्णाच्या संपर्कातील तब्बल ४६ जण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. त्यामुळे आज दिवसभरात दाखल संदिग्ध रुग्णांची संख्या ६० झाली आहे. तर आज दिवसभरात फ्लू बाह्य रुग्ण विभागात १३१ जणांची तपासणी झाली. या सगळ्यांची वैद्यकीय तपासणी, नमुने घेणे आदी कामे आज दिवसभर करण्यात आली, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून प्राप्त झाली आहे.