अकोला (प्रतिनिधी)- राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी आपला जन्मदिवस हा ग्रामजयंती म्हणून साजरा करावा याबाबत सांगताना “ग्रामजयंती के दिन सब करे राष्ट्र के लिये प्रार्थना” असा संदेश देऊन ग्रामजयंतीला सुरुवात केली होती. त्यानुसार केंद्रीय कार्य.सदस्य श्री भानुदास कराळे यांचे मार्गदर्शनाखाली दरवर्षी प्रचारयात्रा काढून विविध धार्मिक, सामाजिक कार्यक्रमांनी व राष्ट्रवंदना घेऊन दि.30 एप्रिल ही ग्रामजयंती मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते. यावर्षी सध्याच्या काळात कोरोना या विषाणूजन्य सांसर्गिक रोगाने संपूर्ण देशात थैमान घातले असून त्याने महाराष्ट्राला मोठ्या प्रमाणात धोका निर्माण केलेला आहे. त्यामुळे मानवजातीवरील या संकटाच्या काळात शासनाच्या लॉकडाऊन व मार्गदर्शक तत्वांचे पालन करणे हे सर्व गुरुदेव उपासकांचेही कर्तव्य आहे. म्हणून अकोला जिल्हा व सर्वच ठिकाणच्या सेवकांनी यावर्षीची ग्रामजयंती आपल्या घरात राहून परिवारासोबतच साजरी करावी. दि.30 एप्रिल रोजी सायंकाळी ७ वाजता कुटूंबियांनी एकत्र येऊन भारतमातेची आरती म्हणजे राष्ट्रवंदना घेऊन या संकटात देशासाठी प्रार्थना करुन जयघोषाने ही ग्रामजयंती साजरी करावी, असे आवाहन अ.भा.गुरुदेव सेवा मंडळाच्या केंद्रीय कार्यकारिणीच्या निर्णयानुसार कार्य.सदस्य भानुदास कराळे, अकोला जिल्हा सेवाधिकारी रविंन्द्र मुंडगावकर, प्रचार प्रमुख अशोक रत्नपारखी, उपसेवाधिकारी उदय मुंडगावकर, विजय पांडे, जिल्हा प्रसिध्दी प्रमुख पत्रकार संजय देशमुख यांनी केले आहे.