अकोला,दि.२६– जिल्ह्यात आज दिवसभरात कोरोना संसर्ग तपासणीचे १२ अहवाल प्राप्त झाले. त्यातील एक रुग्ण पॉझिटीव्ह असून उरलेले सर्व ११ निगेटीव्ह आले आहेत. त्यामुळे अकोला जिल्ह्यातील पॉझिटीव्ह रुग्ण संख्येत एकाने वाढ झाली आहे. आज पॉझिटीव्ह आढळलेला रुग्ण हा अकोला शहरातील सिंधी कॅम्प भागातील रहिवासी आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सूत्रांनी दिली आहे. दरम्यान रुग्ण ज्या भागातील आहे तो सिंधी कॅम्प व पक्की खोली परिसर प्रतिबंधित केल्याचे, आदेश उपविभागीय दंडाधिकारी डॉ. निलेश अपार यांनी जारी केले आहेत.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजअखेर एकूण ५३९ नमुने पाठविण्यात आले आहेत. त्यापैकी ५३६ अहवाल आले आहेत. आजअखेर एकूण ५१९ अहवाल निगेटीव्ह प्राप्त झाले आहेत व तीन अहवाल प्रलंबित आहेत.
आजपर्यंत एकूण ५३९ जणांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे ४१९, फेरतपासणीचे ८२ तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे ३८ नमुने होते. आजपर्यंत एकूण ५३६ अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे ४१६ तर फेरतपासणीचे ८२ व वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे ३८ अहवाल आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या ५१९ आहे. आज प्राप्त झालेल्या १२ अहवालात एक पॉझिटीव्ह तर ११ अहवाल निगेटीव्ह आले आहेत. तसेच बैदपुरा भागातील रहिवासी असलेला जिल्ह्यातील पहिल्या रुग्णाचा पाचवा व सहावा तपासणी अहवाल निगेटीव्ह आला आहे, अशी माहितीही शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत देण्यात आली आहे. त्यामुळे उपचार करणाऱ्या यंत्रणेस काहीसा दिलासा मिळाला आहे.
जिल्ह्यात आता एकूण कोवीडबाधीत रुग्णसंख्या १७ झाली आहे. त्यातील दोघे मयत झाले. गुरुवारी (दि.२३) सात जणांना घरी सोडण्यात आले. आज एकाच्या पॉझिटीव्ह अहवालाची भर पडल्यामुळे आता आजअखेर आठ रुग्ण उपचार घेत आहेत,अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील सूत्रांनी दिली आहे. उपचार घेत असलेल्या सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याचेही शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.
आजअखेर जिल्ह्यात तीन अहवाल प्रलंबित असून ते तिनही अहवाल प्राथमिक आहेत. जिल्ह्यात आज अखेर बाहेरुन आलेल्या ५६२ प्रवाश्यांपैकी २२२ जण गृह अलगीकरणात तर ७८ जण संस्थागत अलगीकरणात असे एकूण ३०० जण अलगीकरणात आहेत. २४० जणांची अलगीकरणाची १४ दिवसांची मुदत पूर्ण झाली आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त झाली आहे.
सिंधी कॅम्प परिसर प्रतिबंधित
आज पॉझिटीव्ह आढळलेला रुग्ण हा सिंधी कॅम्प भागातील पक्की खोली परिसरातील रहिवासी असल्याने आता सिंधी कॅम्प व पक्की खोली परिसर प्रतिबंधित करण्यात आला आहे. तसे आदेश उपविभागीय दंडाधिकारी डॉ. निलेश अपार यांनी आज जारी केले आहेत. आता या भागातील रहिवासी बाहेरील भागात व बाहेरील व्यक्ती या भागात जाऊ अथवा येऊ शकणार नाहीत. या भागातील प्रत्येक घरी जाऊन आरोग्य तपासणी केली जाईल. तसेच या व्यक्तीच्या संपर्कांचाही तपास करण्याचे काम सुरु झाले आहे.
जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन
दरम्यान जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी नागरिकांना घरातच थांबण्याचे आवाहन केले आहे. आजाराची कोणतीही लक्षणे दिसल्यास ती लपवू नका. तात्काळ डॉक्टरांना वा शासकीय दवाखान्यात दाखवा. लक्षणे लपवून राहू नका. नागरिकांनी अनावश्यक घराबाहेर पडू नका. बाहेर पडतांना मास्क लावा. कोणाही व्यक्तीपासून सुरक्षित अंतर ठेवा. घरी आल्यावर साबणाने हात धुवा. स्वच्छता राखा असे आवाहन जिल्हाधिकारी पापळकर यांनी केले आहे.