उरळ (प्रतिनिधी)- तालुक्यातील डोंगरगाव परिसरातील नदीपात्रात वाळूचा मोठा साठा आहे. यावर वाळू माफियांची नजर असून, वाळू तस्करी होत आहे. मागील काही दिवसांपासून संचारबंदी असल्याचा फायदा घेत, काही वाळू चोरट्यांकडून नदीपात्रापर्यंत रस्ता करत वाळूचोरी करण्यात येत आहे. गुरुवारी (ता.२३) ताब्यात घेतलेला वाळूचा साठा मन नदीपात्रालगत असलेल्या गट क्र. ६६४ या शेतात करण्यात आला होता.
कोरोना व्हायरस संसर्ग थांबवण्यासाठी लॉकडाउन जाहीर करण्यात आले असून, संचारबंदी चालू आहे. सध्या प्रशासनाचे सर्व लक्ष कोरोना संसर्ग थांबवण्याकडे असल्याचा फायदा घेत अवैध वाळू उपसा करणाऱ्या वाळू माफियांनी पुन्हा मन नदीचे पात्र पोखरण्यास सुरुवात केली आहे. बाळापूर तालुक्यातील डोंगरगांव येथील सर्तक ग्रामस्थांनी अशाच प्रकारे होणारी वाळूचोरी महसूल प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली आहे. यावेळी अवैध वाळू साठा जप्त व पंचनामा करून डोंगरगाव येथील सरपंच ब्रह्मदेव इंगळे यांच्या ताब्यात दिला आहे.
ग्रामस्थांनी उघड केला प्रकार
तालुक्यातील डोंगरगाव परिसरातील नदीपात्रात वाळूचा मोठा साठा आहे. यावर वाळू माफियांची नजर असून, वाळू तस्करी होत आहे. मागील काही दिवसांपासून संचारबंदी असल्याचा फायदा घेत, काही वाळू चोरट्यांकडून नदीपात्रापर्यंत रस्ता करत वाळूचोरी करण्यात येत आहे. गुरुवारी (ता.२३) ताब्यात घेतलेला वाळूचा साठा मन नदीपात्रालगत असलेल्या गट क्र. ६६४ या शेतात करण्यात आला होता. दरम्यान, ही बाब डोंगरगाव येथील सर्तक ग्रामस्थांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी याची माहिती महसूल प्रशासनाला दिली. त्यानुसार गुुरुवारी मंडळ अधिकारी नीलकंठ नेमाडे, तलाठी योगेश पाखरे, भानुदास मस्के, नंदकिशोर जाणे यांच्या पथकाने उत्तम बंसी तायडे यांच्या गट क्रमांक ६६४ या शेतातील अंदाजे सहा ब्रास वाळू साठा जप्त करून पंचनामा करण्यात आला.
सही केल्याने मारहाण
वाळूसाठा जप्त केल्यानंतर पंचनाम्यावर सही केली म्हणून डोंगरगाव येथील संजय मांजरे याने येथील तंटामुक्त समितीचे अध्यक्ष उत्तम नेमाडे यांना बेदम मारहाण केली. या प्रकरणी तंटामुक्त अध्यक्षांनी उरळ पोलिस ठाणे गाठत तक्रार दिली असून, या प्रकरणी उरळ पोलिसांनी संजय मांजरे याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.