अकोला- कोरोना विषाणुचा संसर्ग टाळण्यासाठी विविध प्रकारच्या उपाययोजना करण्यात येत आहेत त्याचाच एक भाग म्हणुन देशात लॉकडाऊन चा निर्णय घेण्यात आलेला आहे. या निर्णयामुळे गैरसोय होऊ नये म्हणुन उज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना एप्रिल ते जुन २०२० या तिन महिन्यात एलपीजी गॅस सिलेंडर मोफत देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.
यासंदर्भात जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, अकोला जिल्ह्यात एकुण एक लाख नऊ हजार ७७६ लाभार्थ्यांना मोफत सिलेंडर मिळणार आहे. त्यासाठी जिल्ह्यातील ३४ एलपीजी वितरक स्थानिक प्रशासनाच्या सल्ल्यानुसार काम करत आहे. लॉकडाऊनच्या काळात पुरेल एवढा एलपीजी साठा सर्वच वितरकांकडे आहे,कोणतीही कमतरता नाही त्यामुळे जनतेने घाबरून जाऊ नये,असे जिल्हा पुरवठा अधिकारी बी.एस. काळे यांनी आवाहन केले आहे.
एप्रिल महिन्यासाठी घरगुती सिलेंडरची रिफिल किंमत उज्वला लाभार्थ्यांच्या लिंक केलेल्या बँक खात्यात अगोदर जमा करण्यात आली आहे. प्रधानमंत्री उज्वला गॅस योजनेच्या प्रत्येक ग्राहकाला दरमहा एक फ्री सिलेंडर मिळण्याचा हक्क असेल, शेवटचा रिफिल मिळाल्यानंतर १५ दिवसांनी लाभार्थी पुढील रिफिल बुक करू शकतो. रिफिल बुक करतांना फक्त आयव्हीआरएस किंवा नोंदणीकत मोबाईल क्रमांकाव्दारे करणे आवश्यक आहे. जर ग्राहकांना गॅस बुकिंग करण्यास अडचण येत असेल तर त्यांना गॅस एजन्सी मार्फत मॅन्युअल बुकिंग सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ग्राहकांना सिलेंडर मिळविण्यासाठी संबंधित एलपीजी गॅस वितरण कंपनीच्या एजन्सी किंवा गोदामामध्ये जाण्याची आवश्यकता नाही. सर्वांना घरपोच सिलेंडर सेवा मिळणार आहे.
एका महिन्यामध्ये एकच सिलेंडर मिळेल, दुसऱ्या महिन्याचे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यात तेव्हाच मिळतील जेव्हा लाभार्थ्यांनी पहिल्या महिन्याचे सिलेंडर घेतले असेल.
अकोला जिल्ह्यातील लाभार्थ्यांनी आपल्या उज्वला योजनेच्या सिलेंडरचे बुकिंग-
भारत पेट्रोलियम कंपनी करीता-7718012345
इंडियन ऑईल कंपनीकरीता- 9623224365
हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीकरीता-8888823456
या मोबाईल क्रमांकावर करावी. या संदर्भात काही अडचण वा तक्रार असल्यास जिल्हा पुरवठा कार्यालयाचा संपर्क क्रमांक 0724-2435117 वर संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी बी.एस. काळे यांनी केले आहे.