अकोला- जिल्ह्यात आज आणखी एका कोरोना पॉझिटीव्ह रुग्णाची भर पडली आहे. आज प्राप्त ३२ अहवालांनुसार एक रुग्ण पॉझिटीव्ह तर अन्य ३१ जणांचे अहवाल निगेटीव्ह असल्याचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सूत्रांनी स्पष्ट केले आहे. त्यानुसार,आता जिल्ह्यात कोविडबाधीत १६ रुग्ण असून त्यातील दोघे मयत आहेत. तर अन्य १३ पैकी फेरतपासणीत ११ जण निगेटीव्ह आहेत,फेरतपासणीतील एक तर नव्याने तपासणी झालेले दोघे असे तीन रुग्ण पॉझिटीव्ह आहेत. दरम्यान आज पॉझिटीव्ह अहवाल आलेला रुग्ण हा एक १४ वर्षीय मुलगा असून दि.१३ रोजी उपचारादरम्यान मयत झालेल्या रुग्णाचा तो मुलगा आहे.
यासंदर्भात प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण ४०८ जणांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे ३२६, फेरतपासणीचे ६० तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे २२ नमुने होते. आज ३२ अहवाल प्राप्त झाले. त्यात ३१ निगेटीव्ह व एक पॉझिटीव्ह अहवाल आला आहे. आजपर्यंत एकूण ३९३ अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे ३११ तर फेरतपासणीचे ६० व वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे २२ अहवाल आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या ३७७ आहे.
आजअखेर जिल्ह्यात १५ अहवाल प्रलंबित असून ते सर्व प्राथमिक अहवाल आहेत. सद्यस्थितीत ८९ रुग्ण भरती आहेत.
आज जे ३२ अहवाल प्राप्त झाले त्यात एक नवीन रुग्ण पॉझिटीव्ह आहे. तर अन्य ३१ निगेटीव्ह आहेत. निगेटीव्ह अहवालात २३ प्राथमिक तपासणीचे तर आठ अहवाल वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे आहेत.
जिल्ह्यात आज अखेर ४७० जण बाहेरुन आलेल्यांची संख्या आहे. त्यापैकी १०० जण गृह अलगीकरणात तर ९५ जण संस्थागत अलगीकरणात असे एकूण १९५ जण अलगीकरणात आहेत. १८८ जणांची अलगीकरणाची १४ दिवसांची मुदत पूर्ण झाली आहे तर विलगीकरणात आता ८६ जण दाखल आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त झाली आहे.
४४ जण विलगीकरणातून अलगीकरणात
तर अलगीकरणातील ११ जणांना घरी सोडले
दरम्यान शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या विलगीकरण कक्षात दाखल असलेले ४४ जणांना आता संस्थागत अलगीकरणासाठी स्थलांतरीत करण्यात आले. त्यातले ३१ जण हे डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठात तयार करण्यात आलेल्या अलगीकरण कक्षात तर १३ जण बाळापूर येथील कक्षात रवाना करण्यात आले. आता या लोकांना येथे १४ दिवस निरीक्षणात ठेवण्यात येईल. काल पर्यंत डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठातल्या अलगीकरण कक्षात ५० जण होते. त्यातले काल (शनिवारी) ११ जणांना घरी सोडण्यात आले. या ११ जणांत सहा अकोट येथील, चार अकोला येथील तर एक जण बाळापूर येथील होते, अशीही माहिती देण्यात आली.
अधिक वाचा: लॉकडाऊन २.० मधून कुठल्या क्षेत्रांना मर्यादित कालावधीसाठी मुभा; तर कुठल्या क्षेत्रात मुभा नाही