अकोट (तालुका प्रतिनिधी शिवा मगर ): कोरोणाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात कलम 144 लावण्यात आले असून संचारबंदी सुरू आहे. या संचारबंदी मध्ये विनाकारण न फिरणे, सोशल डिस्टन्सींग पाळणे, मास्क लावणे तसेच सार्वजनिक ठिकाणी न थुंकणे, दुकानात रेट बोर्ड लावणे यासारखे लोकांचे उपयोगी उपाययोजना अकोला जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आदेशाद्वारे लागू केलेले आहेत.
अकोट शहरातील नागरिकांना याबाबत सतत सांगण्यात येत आहे परंतु काही नागरिक या निर्देशांकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून आल्यामुळे नाईलाजास्तव अकोट तहसील कार्यालयाचे नायब तहसीलदार हरीश गुरव व नपचे मुख्याधिकारी दादाराव डोल्हारकर यांचे मार्गदर्शनात गठीत करण्यात आलेल्या पथकाचे नोडल अधिकारी करन चिपडे, विजय रताळे यांचेसह वसंत मेगजे, सलीम बेग, निजामुद्दीन, शरद तेलगोटे, संजय गायकवाड शेख शाहरुख, संदीप मोगरे यांनी आज अकोट शहरात दंडात्मक कारवाई केली. तसेच या पथकाद्वारे दररोज नियमांकडे दुर्लक्ष करणाऱ्यांवर कार्यवाही करण्यात येणार आहे.
आज केलेल्या कारवाईत मास्क न लावणे, सोशल डिस्टन्सींग न पाळणे, दुकानात रेट बोर्ड नसणे, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे याकरिता दंड आकारून रक्कम न प निधीत जमा करण्यात आली तसेच प्रतिबंधित क्षेत्रात दुकान लावणाऱ्या व्यापाऱ्यांचे साहित्य जप्त करून न.प. कार्यालयात जमा केले.
अकोट वासियांना दंडात्मक कारवाई करणे हा प्रशासनाचा उद्देश नसून कोरोना चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिलेल्या आदेशाचे पालन करावे व शासनाला सहकार्य करावे असे आवाहन नपचे मुख्याधिकारी दादाराव डोल्हारकर यांनी केले आहे.